गुप्तेश्वर पांडे बक्सरमधून देणार 'दबंग' मुन्ना तिवारींना आव्हान - Former DGP of Bihar Gupteshwar Pandey joins JDU in presence of nitish kumar | Politics Marathi News - Sarkarnama

गुप्तेश्वर पांडे बक्सरमधून देणार 'दबंग' मुन्ना तिवारींना आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. हा मुद्दा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रस्थानी असून, या प्रकरणी आक्रमक भूमिका घेणारे निवृत्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी करणारे बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूमध्ये आज प्रवेश केला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे हे मूळचे बक्सर भागातील असल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, त्यांच्यासमोर 'दबंग' नेते मुन्ना तिवारींचे आव्हान असेल. 

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबतच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) या तीन केंद्रीय यंत्रणा करीत आहेत. सुशांतच्या मृत्यूचा मुद्दा बिहारमधील सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीय) आणि भाजपने लावून धरला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपने या मुद्द्यावरुन मोहीम उघडली आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वत: सुशांत प्रकरणी लक्ष घातले होते. बिहारमध्ये नोव्हेंबरच्या सुमारास विधानसभा निवडणुका होत आहेत. कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनने बिहारमधील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी पोचले आहेत. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न सरकारमोर आहे. याचवेळी राज्यात पुराने थैमान घातले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मदत आणि पुनर्वसनाच्या पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार नवनवीन मुद्दे शोधत आहे. 

यामुळे बिहारमधील सत्तारुढ जेडीयू आणि भाजपने सुरुवातीला सुशांतचा मुद्दा तेथील राजकारणात उचलला. सुशांतला हा मूळचा बिहारचा असल्याने त्याला बिहारचा मुलगा असे संबोधण्यात आले. बिहारच्या मुलाला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणा देत जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. बिहारमधील प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या सगळीकडे सुशांतचे बॅनर आणि मास्क यामुळेच दिसत आहेत. 

गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा अर्ज तातडीने राज्य सरकारने मंजूर केला आहे. आज सायंकाळी त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला. सुशांत प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका अखेर त्यांच्यासाठी लाभदायी ठरली आहे. मुख्यंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुप्तेश्वर पांडे हे मूळचे बक्सरमधील आहेत. त्यामुळे त्यांना तेथून उमेदवारी मिळेल. सध्या काँग्रेसचे 'दबंग' नेते मुन्ना तिवारी तेथे आमदार आहेत. तिवारी हे त्यांच्या गुंडगिरीमुळे कायम चर्चेत असतात. मागील वर्षी त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पांडे यांच्यासमोर आता तिवारी यांचे आव्हान आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख