गुप्तेश्वर पांडेंनी खाकी सोडून परिधान केली भगवी वस्त्रे! - former bihar dgp gupteshwar pandey turns religious preacher | Politics Marathi News - Sarkarnama

गुप्तेश्वर पांडेंनी खाकी सोडून परिधान केली भगवी वस्त्रे!

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे आता नव्या अवतारात लोकांपुढे आले आहे. 

पाटणा :   बिहारचे (Bihar) माजी पोलीस महासंचालक (DGP) गुप्तेश्‍वर पांडे (Gupteshwar Pandey) आता नव्या अवतारात लोकांपुढे आले आहे. खाकी वर्दी सोडल्यानंतर आता त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली असून, ते प्रवचनकाराच्या भूमिकेत शिरले आहेत. देवाची लीला, परलोक आणि श्रीरामाच्या कथा आता ते  भाविकांपुढे सादर करीत आहे. 

सोनपूरच्या हरिहर मंदिरात पांडे आता नियमितपणे प्रवचन करना दिसू लागले आहेत. मंदिराच्या अतिथीगृहाची त्यांनी रंगरंगोटीही केली आहे. पाटणा विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले असून, अनेकदा हरिद्वारला जाऊनही ते रामकथा ऐकवतात. भक्तीमार्गाने जाणारे पांडे हे बिहारमधील पहिलेच आयपीएस अधिकारी नाहीत. त्यांच्याआधी किशोर कुणाल या अधिकाऱ्याने सेवेचा राजीनामा देऊन पाटण्यातील हनुमान मंदिराची जबाबदारी स्वीकारली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या जमिनीच्या वादात ते पक्षकारही होते. 

सुशांत मृत्यू प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक पांडे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा अर्ज तातडीने राज्य सरकारने मंजूर केला होता. मुख्यंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश केला होता. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. सुशांत प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका अखेर त्यांच्यासाठी लाभदायी ठरल्याचे चित्र होते.   

हेही वाचा : आयाराम गयाराम...दहा वर्षांत एकाही नेत्यावर पक्षांतरबंदीची कारवाई नाही 

गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. पांडे हे मूळचे बक्सर भागातील असल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, तेथील दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेल्याने जेडीयूने त्यांना तिकिट नाकारले होते. पांडे हे १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूनंतर केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले होते.

राज्यात २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल, अशी त्यांना आशा होती. परंतु तसे घडले नाही. यापूर्वी २०१४मध्येही त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बक्सर लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावले होते परंतु, यश मिळाले नव्हते. त्यावेळी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर झाला नसल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख