शशिकलांच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अन् बरंच काही..! - former aiadmk mla seeks permission for flowering petals on sasikala from helicopter | Politics Marathi News - Sarkarnama

शशिकलांच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अन् बरंच काही..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

शशिकला यांच्या सुटकेने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरवात झाली आहे. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी सुरू झाली आहे. 

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे. शशिकलांचे स्वागत करण्यासाठी बॅनरबाजीची स्पर्धा अण्णाद्रमुकच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. पक्षाने नेत्यांची हकालपट्टी करुनही शशिकलांचे स्वागत थांबत नसल्याचे चित्र आहे. यातच आता एका माजी आमदाराने शशिकलांचे राज्यात आगमन झाल्यानंतर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची तयारी सुरू केली आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्या 8 फेब्रुवारीला तमिळनाडूत परतणार आहेत. 

अण्णाद्रमुकच्या माजी आमदार सी.जयंती यांनी शशिकलांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यांनी शशिकलांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी  खासगी हेलिकॉप्टर त्या भाड्याने घेणार आहेत. शशिकलांचा ताफा कूथमपक्कम येथून जाईल त्यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 

यासाठी जयंती यांनी वेल्लोरचे जिल्हाधिकारी ए.शण्मुग सुंदरम यांच्याकडे परवानगी मागणारा अर्ज केला आहे. शशिकलांवर खासगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी त्यांनी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत परवानगी द्यावी, असे म्हटले आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांच्या या मागणीला परवानगी मिळते की नाही हे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

शशिकलांना घेरण्याची व्यूहनीती; सरकारमधील मंत्र्यांची पोलीस महासंचालकांकडे धाव

जयंती या अण्णाद्रमुकच्या आमदार होत्या. त्या अण्णाद्रमुकच्या तिकिटावर 2016 मध्ये निवडून आल्या होत्या. मुख्यमंत्री पलानीस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याप्रकरणी अपात्र ठरवण्यात आलेल्या 18 आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. नंतर त्यांनी शशिकलांचे भाचे दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (अम्मा) पक्षात प्रवेश केला होता.  

शशिकला या पक्षाच्या सदस्य नाहीत. पक्षाच्या प्रत्येक सदस्याला दर पाच वर्षांना सदस्यत्वाचे नूतनीकरण करावे लागते. त्यांची आम्ही पक्षातून हाकलपट्टी केलेली नाही. आम्ही त्यांना पक्षातून काढण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मुनुस्वामी यांनी म्हटले आहे. 

शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख