नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली असली तरी या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच कोरोना लस घेतलेल्या पाच डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे लशीच्या परिणामकारकतेबाबत शंका उपस्थित होत आहे. तज्ञांनी मात्र, ही बाब सामान्य असल्याचे म्हटले आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीपासून देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. त्यावेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला होता. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असल्याचा संदेश मोदींनी दिला होता. तीन कोटी लोकांना लस मोफत देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे.
कोरोना लस घेतलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारने मात्र, या मृत्यूंचा लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. यामुळे डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारीच कोरोनाची लस नाकारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकाराने सरकारची डोकेदुखी वाढली होती.
यातच कोरोना लस घेतलेल्या पाच डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्रकार कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात समोर आला आहे. पाच डॉक्टरांनी लस घेतल्यानंतर आठवडाभरातच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे तज्ञांनी लशीच्या परिणामकारकतेबाबत शंका उपस्थित करण्यास सुरवात केली आहे.
कोरोना लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेले पाचही डॉक्टर हे चामराजनगर जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. ते सर्व जण 40 ते 50 वयोगटातील आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. यातील काही जणांनी कोव्हॅक्सिन तर काहींनी कोव्हिशिल्ड लस घेतली होती, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.सी.रवी यांनी दिली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांनी कोरोनाची पहिली लस टोचून घेतली होती. त्यानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. अशा प्रकारे संसर्ग होणे ही नवीन बाब नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लशीनंतर संसर्ग झाल्यास ती गंभीर बाब मानावी लागेल.
कोरोनाचे लसीकरण सुरू असले तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वांनीच करायला हव्यात. मास्क वापरावेत, हात धुवावेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोरोनाच्या दोन्ही लशी घेतलेल्यांनीही बहुतांश लोक लस घेत नाहीत तोपर्यंत अशी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
Edited by Sanjay Jadhav

