भाजपने इतिहास घडवला...पहिल्यांदाच एनडीएच्या मंत्रिमंडळाने घेतली शपथ - first nda cabinet in puducherry take oath by governor | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने इतिहास घडवला...पहिल्यांदाच एनडीएच्या मंत्रिमंडळाने घेतली शपथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जून 2021

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये एनआर काँग्रेस आणि भाजप आघाडीने सत्ता मिळवली आहे. 
 

पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये (Puducherry) एनआर काँग्रेस (NR Congress) आणि भाजप (BJP) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) सत्ता मिळवली आहे. विजय मिळाल्यानंतर तब्बल 50 दिवसांनी अखेर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आहे. मुख्यमंत्री एन.रंगास्वामी यांच्या एनआर काँग्रेसला तीन तर भाजपला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. भाजप आघाडीच्या मंत्रिमंडळाने पहिल्यांदाच पुदुच्चेरीत शपथ घेतली आहे. 

एनआर काँग्रेस आणि भाजप आघाडीला एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळाला होता. त्यानंतर 7 मे रोजी रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता होती. एनआर काँग्रेस आणि भाजपमध्ये मंत्रिपदांवरुन रस्सीखेच सुरू होती. अखेर एनआर काँग्रेसला 3 आणि भाजपला 2 मंत्रिपदे मिळाली आहे. एकूण मंत्रिमंडळाची  क्षमता 6 असून, राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांनी मंत्र्यांना शपथ दिली.

एनआर काँग्रेसचे के.लक्ष्मीनारायण, सी.देजाकुमार आणि चंदिरा प्रियांगा यांचा मंत्र्यांमध्ये समावेश आहे. भाजपचे नमशिवायम आणि साई जे सर्वानन यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांचा शपथविधी राजभवनात झाला. चंदिरा प्रियांगा या मागील 41 वर्षांतील पुदुच्चेरीमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. याचबरोबर भाजपला प्रथमच पुदुच्चेरीत मंत्रिपद मिळाले आहे. भाजपला आधीच विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले असून, त्याजागी आर.सेल्वम यांची निवड करण्यात आली आहे. 

हेही वाचा :  भाजपच्या नेत्यांनंतर आता प्रशांत भूषण यांनाही ट्विटरचा दणका! 

भाजपने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरल्याने नवीन मंत्रिमंडळाची स्थापना रखडली होती. अखेर भाजपला विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या मंत्रिमंडळात एकूण सहा मंत्री असून, यात एनआर काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन मंत्री आहेत.    

पुदुच्चेरीतील एकूण 30 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीने विजय मिळवला होता. यात एनआर काँग्रेसला 10 आणि भाजपला 6 जागा मिळाल्या होत्या.  द्रमुक आणि काँग्रेसला अनुक्रमे 6 आणि 2 जागा मिळाल्या होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 15 होत्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने पुदुच्चेरीत काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख