नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. देशभरातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात आंदोलनासाठी दिल्लीत पोचत आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर होत होता. शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. परंतु, आता शेतकऱ्यांनी बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास नकार देत दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे. यामुळे दिल्लीची नाकेबंदी झाली आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना रोखणे सरकारला महागात पडल्याचे चित्र दिसू लागले आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी काही अटी घातल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काल शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास यावे, असे आवाहन केले होते. शेतकरी बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास आल्यानंतर केंद्र सरकार चर्चा करेल, अशी अटही घातली आहे. त्यामुळे हे आवाहन शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले आहे.
दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजपशासित हरियानात शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुरारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा अडवून एकप्रकारे आता दिल्लीला वेढा घातला आहे.
सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग चौथा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.
Edited by Sanjay Jadhav

