हे तर लुटारूंचे शेवटचे बादशहा! - Farmers leader Rakesh Tikait slams PM Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

हे तर लुटारूंचे शेवटचे बादशहा!

अतुल मेहेरे
रविवार, 17 जानेवारी 2021

कृषी कायदे रद्द होईपर्यत घरी परतायचे नाही हा आंदोलकांचा वज्रनिर्धार आहे. किमान हमी भावाचा कायदा झालाच पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे.

नागपूर : लुटारूंचे शेवटचे बादशहा कोण आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. हे बादशहा शेतकऱ्यांना लुटण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहेत. पण, आम्ही या बादशहाचे प्रयत्न हाणून पाडू, अशी खरमरीत टीका संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. 

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना टिकैत यांनी केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर टीका करताना सत्ताधाऱ्यांचाही खरपुस समाचार घेतला. केंद्रातील विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. कमकुवत विरोधी पक्षामुळेच शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याची आवश्यकता आहे. बाहेर आम्ही लढा देतच आहो. संसदेत विरोधी पक्षाने आमची बाजू मांडली पाहिजे. असे केले तरच ते आमच्यासोबत आहेत, असे आम्ही समजू, असे टिकैत म्हणाले.

आमच्या आंदोलनात सुमारे ५५० संघटना आहेत. यापैकी एकही संघटना माघार घेणार नाही. मे २०२४ पर्यत आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे. इतका दीर्घकाळ धीर धरण्याची तयारी नसणाऱ्यांनी आंदोलनातून बाहेर पडले तरी चालेल. आमचे आंदोलन कोणत्याही पक्षा विरोधात नाही. तर सरकार विरोधात आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे नसते, असे त्यांनी नमुद केले.

कृषी कायदे रद्द होईपर्यत घरी परतायचे नाही हा आंदोलकांचा वज्रनिर्धार आहे. किमान हमी भावाचा कायदा झालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यत आम्ही तसूभरही हलणार नाही, असे टिकैत यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. पण, न्यायालयाने नेमलेल्या समितीतील सर्व सदस्य कायदे समर्थक आहेत. त्यामुळे आम्ही या समितीशी चर्चा वा वाटाघाटी करणार नाही, असे टिकैत म्हणाले.

येत्या २३ जानेवारीला महाराष्ट्रात राजभवनला ट्रॅक्टरने घेराव घालण्यात येईल. पण, नेमक्या कोणत्या राजभवनला हे सांगण्यास टिकैत यांनी नकार दिला. आम्ही गनिमी काव्याने घेराव घालू असे ते म्हणाले.

Edited by Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख