दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर शेतकरी अन् पोलीस भिडले - Farmers continue their protest at Ghazipur Ghaziabad border | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर शेतकरी अन् पोलीस भिडले

वृत्तसंस्था
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, देशभरातील शेतकरी दिल्लीचे सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांनी सीमांवर रोखणे केंद्र सरकारला महागात पडले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडत दिल्लीला वेढा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी नेत्यांनी चार महिने वेढा कायम ठेवण्याचे सूतोवाच केले आहे. दरम्यान, आज रात्री दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर शेतकरी आंदोलक आणि पोलीस आमनेसामने येऊन संघर्षाची स्थिती निर्माण झाली. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी काही अटी घातल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काल शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास यावे, असे आवाहन केले होते. शेतकरी बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास आल्यानंतर केंद्र सरकार चर्चा करेल, अशी अटही घातली आहे. त्यामुळे हे आवाहन शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

याबाबत बोलताना भारतीय किसान युनियन क्रांतिकारीचे (पंजाब) अध्यक्ष सुरजित एस. फूल म्हणाले की, आम्ही बुराडीच्या खुल्या कारागृहात जाण्याऐवजी दिल्लीला वेढा घातला आहे. दिल्लीत प्रवेश करण्याचे पाचही मार्ग आम्ही अडवले आहेत. आमच्याकडे चार महिने पुरेल एवढा शिधा असल्याने आम्हाला कोणतीही काळजी नाही. आमची समिती आता यापुढील आंदोलनाची दिशा ठरवेल.  

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग चौथा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.  

गाझिपूर-गाझियाबाद (दिल्ली-उत्तर प्रदेश) सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे. आज रात्री पोलिसांना लावलेले बॅरिकेड बाजूला करीत शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि शेतकरी एकमेकांशी भिडले. या प्रसंगी संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर येथील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख