सर्वच राजकीय पक्षांना शेतकरी आंदोलनात 'नो एंट्री' - farmer protesters will not allow any political parties in agitation | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वच राजकीय पक्षांना शेतकरी आंदोलनात 'नो एंट्री'

वृत्तसंस्था
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

कृषी कायद्यांविरोधात रान पेटले असून, हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांनी सर्वच राजकीय पक्षांना आता इशारा दिला आहे.  

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांनी सीमांवर रोखणे केंद्र सरकारला महागात पडले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडत दिल्लीला वेढा दिला आहे. याचवेळी शेतकऱ्यांनी आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांना नो एंट्री करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी काही अटी घातल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काल शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास यावे, असे आवाहन केले होते. शेतकरी बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास आल्यानंतर केंद्र सरकार चर्चा करेल, अशी अटही घातली आहे. त्यामुळे हे आवाहन शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या पाचही सीमा अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग चौथा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.  

दरम्यान, शेतकरी आंदोलकांनी सर्वच राजकीय पक्षांना आंदोलनात नो एंट्री केली आहे. याबाबत बोलताना भारतीय किसान युनिनय क्रांतिकारीचे (पंजाब) अध्यक्ष सुरजित एस. फूल म्हणाले की, आम्ही आमच्या मंचावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला बोलू देणार नाही. मग ते क्राँग्रेस, भाजप, आप अथवा इतर कोणत्याही पक्षाचे असोत. आमची समिती आम्हाला पाठिंबा देणाऱ्या इतर संघटनांना बोलण्याची परवानगी देईल. मात्र, यासाठी त्यांना आमचे नियम पाळावे लागतील. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख