आम्ही दिल्लीला वेढा घातलाय अन् चार महिने तो कायम ठेवू शकतो...

कृषी कायद्यांविरोधात रान पेटले असून, हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. दिल्लीत जाण्याचे पाचही मार्ग रोखून शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातला आहे.
Farmer leaders have decided to gherao Delhi by blocking 5 main entry points to Delhi
Farmer leaders have decided to gherao Delhi by blocking 5 main entry points to Delhi

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांनी सीमांवर रोखणे केंद्र सरकारला महागात पडले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडत दिल्लीला वेढा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी नेत्यांनी चार महिने वेढा कायम ठेवण्याचे सूतोवाच केले आहे. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी काही अटी घातल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काल शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास यावे, असे आवाहन केले होते. शेतकरी बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास आल्यानंतर केंद्र सरकार चर्चा करेल, अशी अटही घातली आहे. त्यामुळे हे आवाहन शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

याबाबत बोलताना भारतीय किसान युनियन क्रांतिकारीचे (पंजाब) अध्यक्ष सुरजित एस. फूल म्हणाले की, आम्ही बुराडीच्या खुल्या कारागृहात जाण्याऐवजी दिल्लीला वेढा घातला आहे. दिल्लीत प्रवेश करण्याचे पाचही मार्ग आम्ही अडवले आहेत. आमच्याकडे चार महिने पुरेल एवढा शिधा असल्याने आम्हाला कोणतीही काळजी नाही. आमची समिती आता यापुढील आंदोलनाची दिशा ठरवेल.  

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग चौथा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com