मोठी बातमी : काबूल विमानतळ स्फोटानं हादरलं, आत्मघातकी हल्ला झाल्याची शक्यता

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी विमानतळाबाहेर हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती.
Explosion outside Kabul airport casualties unclear at this time
Explosion outside Kabul airport casualties unclear at this time

काबूल : अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर (Kabul Airport) कधीही इसिसचा (ISIS) हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी काही तासांपूर्वीच दिला होता. हा इशारा खरा ठरला असून काही वेळापूर्वीच विमानतळाबाहेर मोठा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याची भीती शक्यता वर्तविली जात आहे. हल्ल्याची तीव्रता अधिक असल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती असली तरी अद्याप याबाबतची माहिती समोर आलेली नाही. (Explosion outside Kabul airport casualties unclear at this time)

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी विमानतळाबाहेर हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती. भारतासह अमेरिका इतर देशांकडूनही नागरिकांना विमानाने नेले जात होते. तालिबानने 31 ऑगस्टची मुदत दिल्याने सर्व देशांकडून त्यानुसार नियोजन व उपाययोजना केल्या जात होत्या. त्यातच आज गुप्तचर यंत्रणांनी विमानतळावर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला होता. 

त्यानुसार काही वेळापूर्वी विमानतळाबाहेर मोठा स्फोट झाल्याचे पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, यामध्ये किती जीवितहानी झाली आहे, याबाबत स्पष्टता नसल्याचंही पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या हल्ल्यानंतरची काही भयावह दृश्य समोर आली आहेत. जखमी अवस्थेतील लोकांना तातडीने उपचारासाठी नागरिकांकडून नेले जात आहे. 

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर 11 दिवसांपासून अमेरिका आणि इतर देश नागरिकांना तेथून बाहेर काढत आहेत. इतिहासातील ही अशा प्रकारची सर्वांत मोठी मोहीम ठरली आहे. आतापर्यंत काबूलमधून 88 हजार नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. काबूल विमानतळावरुन दर 39 मिनिटांनी अमेरिकेचे लष्करी विमान बाहेर पडत आहे. कागदपत्रांची योग्य तपासणी करुनच नागरिकांना बाहेर जाऊ देण्याची अट आधीच तालिबानने घेतली आहे. 

एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. हजारो नागरिकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची अंतर्गत सुरक्षा करीत आहेत. तालिबानी सुरक्षारक्षक विमानतळाबाहेर सुरक्षेसाठी तैनात आहेत. तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानमध्ये राहण्यापेक्षा हजारो नागरिक देश सोडून पलायन करीत आहेत.   

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com