विजय रुपानी म्हणतात...मी आधीही 'सीएम' होतो अन् पुढेही राहीन!

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी (Vijay Rupani) यांना मागील आठवड्यात अचानक पदावरून हटवण्यात आलं.
विजय रुपानी म्हणतात...मी आधीही 'सीएम' होतो अन् पुढेही राहीन!
Ex Chief Minister Vijay Rupani says i will continue to be CM

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी (Vijay Rupani) यांना मागील आठवड्यात अचानक पदावरून हटवण्यात आलं. त्यांच्या जागी पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपानी यांनी मंगळवारी आपण यापुढेही 'सीएम' (CM) राहणार असल्याचं म्हटलं आहे. (Ex Chief Minister Vijay Rupani says i will continue to be CM)

रुपानी यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं असलं तरी 'सीएम'चा अर्थ त्यांनीच समजावून सांगितला आहे. CM म्हणजे मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन असल्याचं ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी आधीही सीएम होतो, आजही आहे आणि पुढेही सीएम राहीन. पक्षानं मला बुथ पातळीवरील छोटी जबाबदारी दिली तरी मी करायला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. 

गुजरातचे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले रुपानी म्हणाले, मला एक दिवस आधी रात्री राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संघटनेत काम करण्याची आपलीच इच्छा होती, असा दावाही रुपानी यांनी केला. 

रुपानी यांच्या मुलीचं टीकाकारांना उत्तर
रुपानी यांची मुलगी राधिका यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. राधिका यांनी म्हटले आहे की, २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता, तेव्हा माझे वडील मोदीजींच्या आधी तिथे पोहोचले होते. 'मुलीच्या दृष्टीकोनातून विजय रूपाणी' असे म्हणत ही फेसबुक पोस्ट केली आहे. तर नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, चक्रीवादळासारख्या मोठ्या समस्यांमध्ये माझे वडील सकाळी २.३० पर्यंत उठायचे आणि लोकांसाठी व्यवस्था करण्यासाठी फोनवर गुंतलेले असायचे.

माझ्या वडिलांचा कार्यकाळ एक कार्यकर्ता म्हणून सुरू झाला आणि अनेक राजकीय पदांद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. मात्र, माझ्या मते, माझ्या वडिलांचा कार्यकाळ १९७९ मध्येधील मोरबी पूर, अमरेलीतील ढगफुटी, कच्छ भूकंप, स्वामीनारायण मंदिर दहशतवादी हल्ला, गोध्रा घटना, बनासकांठा पूर या घटनांपासून सुरु झाला. माझे वडील वादळात आणि कोरोनाच्या काळातही मोठ्या प्रमाणात काम करत होते, असेही राधिका यांनी सांगितले आहे.

पप्पांनी त्यांचे वैयक्तिक काम कधीच पाहिले नाही. त्यांना जी काही जबाबदारी मिळाली ती पूर्ण केली. कच्छ भूकंपाच्या वेळी ते सर्वात आधी तिथे गेले होते. लहानपणीही आई -वडिलांनी फिरायला नेले नाही. चित्रटगृहात नाही तर ते आम्हाला कार्यकर्त्यांच्या घरी घेऊन जात असत. स्वामी नारायण अक्षरधाम मंदिरात दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तेथे पोहोचणारे पहिले व्यक्ती माझे वडील होते. ते मोदींच्या आधीच मंदिर परिसरात पोहोचले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in