मोठी बातमी : कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनची नो एंट्री!

युरोपियन युनियनने त्यांच्या व्हॅक्सिन पासपोर्टमध्ये कोव्हिशिल्डचा समावेश केलेला नाही.
मोठी बातमी : कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनची नो एंट्री!
european union not recognises serum institutes covid vaccine

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरण (Covid Vaccination) पुन्हा एकदा वेगाने सुरू झाले आहे. परंतु, आता कोव्हिशिल्ड (Covishield) लशीबाबत नवीन समस्या निर्माण झाली आहे. युरोपियन युनियनने (European Union) त्यांच्या व्हॅक्सिन पासपोर्टमध्ये (Vaccine Passport) कोव्हिशिल्डचा समावेश केलेला नाही. त्यामुळे ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन दरवाजे सध्या तरी बंद अथवा त्यांच्यावर निर्बंध राहतील, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

युरोपियन युनियनच्या नवीन व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नाही. 1 जुलैपासून युरोपियन युनियन डिजिटल कोव्हिड सर्टिफिकेट योजना सुरू करीत आहेत. याअंतर्गत कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना युरोपियन युनियनमध्ये मुक्तपणे कुठेही प्रवास करता येईल. संबंधित व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे, तो निगेटिव्ह चाचणी केलेला अथवा कोरोनातून बरा झालेला याचा पुरावा हे प्रमाणपत्र पुरावा असेल. युरोपियन युनियनच्या बाहेरील व्यक्तींना हे प्रमाणपत्र सदस्य देशांममध्ये प्रवास करण्यासाठी आवश्यक असेल. 

या योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नसल्याने ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करता येणार नाही. त्यांना प्रवास करण्यासाठी अनेक बंधने असतील. त्यांना विलगीकरणात राहावे लागेल अथवा प्रत्येक देशांतील नियमांप्रमाणे उपाययोजना कराव्या लागतील.    

मागील 24 तासांत भारतात कोरोनाचे 46 हजार 148 रुग्ण सापडले असून, 979 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर पोचली आहे. याचबरोबर एकूण कोरोना मृत्यू 3.96 लाखांवर गेले आहेत. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी होत आहे. देशातील एकूण 5.6 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Related Stories

No stories found.