मोठी बातमी : रिया चक्रवर्तीला 'ईडी'ची क्लिनचिट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील गूढ अद्याप कायम आहे. उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर केल्यानंतर आता ईडीकडूनही तिला दिलासा मिळाला आहे.
enforcement directorate gave cleanchit to actress rhea chakraborty
enforcement directorate gave cleanchit to actress rhea chakraborty

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या बँक खात्यावरील 15 कोटी रुपयांचा अपहार केला, असा आरोप रिया चक्रवर्तीवर करण्यात आला होता. याचा तपास सक्त वसुली संचालनालय (ईडी) करीत आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात कोणताही पुरावा ईडीला सापडलेला नाही. त्यामुळे ईडीने अखेर रियाला क्लिनचिट दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

ईडीकडून सुशांतच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत होती. मागील दोन महिन्यांपासून ईडीचा तपास सुरू होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने सुशांतचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले आहेत. यात त्याची बँक खाती, व्यावसायिक करार आणि व्यवसाय यांचा समावेश आहे. आता तपासात यात रियाचा यात काही सहभाग नसल्याचे समोर आले आहे. सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या खात्यावरील 15 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला होता. 

ईडीच्या तपासात रियाविरोधात काहीही संशयास्पद आणि अनियमित आढळलेले नाही. सुशांतच्या खात्यावरील सुमारे 2.78 कोटी रुपये हे प्राप्तिकर आणि वस्तू व सेवा कर भरण्यासाठी गेले होते. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. आता ईडी केवळ सुशांतच्या खात्यावरुन झालेल्या छोट्या रकमांच्या व्यवहारांची तपासणी करीत आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला 6 सप्टेंबरला अटक केली होती. उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे. 'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले आहे. 
सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com