फ्रान्सची सुरक्षा सर्वोच्च पातळीवर..सैन्य तैनात करणार - Emmanuel Macron raises France security status to highest level | Politics Marathi News - Sarkarnama

फ्रान्सची सुरक्षा सर्वोच्च पातळीवर..सैन्य तैनात करणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

फ्रान्समधील नीस शहरात झालेल्या हल्ल्यावरुन जगभरात वातावरण पेटले आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांनी हा देशावर हल्ला झाला आहे, असे म्हटले आहे. 

पॅरीस : फ्रान्समधील नीस शहरात झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जण ठार झाले असून, काही जण जखमी होते. या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाच्या सुरक्षेवरच हा हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षेचा स्तर सर्वोच्च पातळीवर नेला आहे. 

नीसमधीन नोत्रे-डेम बॅसिलिका येथे काल (ता.30) एक व्यक्तीने चाकूहल्ला केला होता. यात दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला तर इतर काही जण जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी हल्लोखोराला अटक केली असून, चौकशी सुरू केली आहे. याआधी फ्रान्समधील नैऋत्येकडील शहर अॅव्हिग्नॉन आणि सौदी अरेबियातील फ्रान्सचा दूतावास याठिकाणीही चाकूहल्ले झाले आहेत. 

काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेषिताचे व्यंगचित्र दाखवले होते. यामुळे संतापलेल्या एका 18 वर्षांच्या युवकाने सॅम्युएल पॅटी या शिक्षकाचा पॅरीसच्या उपनगरी भागात शिरच्छेद केला होता. दोन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेपासून फ्रान्समध्ये चाकूहल्ले सुरू झाले आहेत. पॅटी यांच्या मृत्यूनंतर फ्रान्स सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला होता. 

आता देशात काही ठिकाणी झालेल्या चाकूहल्ल्यांमुळे फ्रान्समध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी देशावरील हे हल्ले असून, सुरक्षा धोक्यात आल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांनी देशात सैन्य तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दर्जा सर्वोच्च पातळीवर नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचबरोबर आता देशात तैनात सैन्यबळ 3 हजारहून 7 हजारांवर नेण्यात येणार आहे. 

याबाबत बोलताना मॅक्रॉन यांनी सर्वांसाठी एकतेचा नारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुमचा धर्म कोणताही असो, तुम्ही धर्मावर विश्वास ठेवणारे अथवा न ठेवणारे असा, परंतु, या काळात आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण समाजात फूट पाडणाऱ्या विचारांना स्थान देणे टाळायला हवे. 

फ्रान्समधील हल्ल्यांचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला आहे. अमेरिका या प्रसंगी फ्रान्ससोबत उभी आहे, अशी ग्वाही ट्रम्प यांनी दिली आहे. सौदी अरेबियानेही फ्रान्सला पाठिंबा देत या हल्ल्यांचा निषेध केला आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख