कमलनाथ यांना वेडा ठरवणं भाजप नेत्याला पडल चांगलच महागात - Election Commission of India has issued notice to BJP leader Imarti Devi | Politics Marathi News - Sarkarnama

कमलनाथ यांना वेडा ठरवणं भाजप नेत्याला पडल चांगलच महागात

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मिनी विधानसभा ठरणाऱ्या या निवडणुकांचा जोरदार प्रचार चालू असून, राजकीय नेत्यांकडून चिखलफेक सुरू आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी आता अडचणीत आल्या आहेत. त्यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांनी वेडा ठरवले होते. निवडणूक आयोगाने या प्रकरणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावून 48 तासांत म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. 

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. आमचा येथील उमेदवार तिच्यासारखा नाही...काय बरे तिचे नाव? असा सवाल कमलनाथ यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला होता. त्यावेळी नागरिकांना इमरती देवी यांचे नाव घेण्यास सुरूवात केली. यावर कमलनाथ म्हणाले होते की, माझ्यापेक्षा तुम्ही तिला चांगले ओळखता. तुम्ही लोकांनी आधीच मला सावधगिरीचा इशारा द्यायला हवा होता. ये क्या आयटम है. 

याला आता इमरती देवी यांनी उत्तर दिले होते. त्यांनी कमलनाथ यांना वेडा ठरवले होते. त्यांनी म्हटले होते की, तो वेडा झाला आहे. त्याची आई-बहीण या बंगालमधील आयटम असतील. 

आता इमरती देवी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. कमलनाथ यांना वेडा म्हणणे त्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इमरती देवींनी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यास त्यांना 48 तासांचा कालावधी दिला आहे. 

कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी याआधी निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. यामुळे कमलनाथ अडचणीत आले आहेत. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले होते. कमलनाथ यांनी महिला उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे महिला आयोगाने म्हटले होते. या प्रकरणी भाजपनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख