कमलनाथ प्रकरणात निवडणूक आयोग म्हणतो, सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडणार - Election Commission to file reply at earliest in supreme court | Politics Marathi News - Sarkarnama

कमलनाथ प्रकरणात निवडणूक आयोग म्हणतो, सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडणार

वृत्तसंस्था
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडुणकांच्या प्रचारात राजकीय नेत्यांकडून व्यक्तिगत चिखलफेकीला जोर आला होता. यामुळे निवडणूक आयोगाने कारवाईचा धडाका सुरू केला होता. 

नवी दिल्ली : माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारक हा दर्जा काढून घेतला होता. कमलनाथ यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देत आयोगाला खडे बोल सुनावले आहेत. आता निवडणूक आयोग यावर म्हणणे मांडणार आहे. 

मध्य प्रदेशात काँग्रेसची सगळी भिस्त कमलनाथ यांच्यावर आहे. त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढल्याचे काँग्रेसच्या जिव्हारी लागले होते. अखेर कमलनाथ यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होते. त्यांचे स्टार प्रचारकपद काढून घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगत सरन्यायाधीशांनी आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली. स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुणी दिला? हा अधिकार आयोगाचा आहे की पक्षाच्या नेत्याचा? राजकीय पक्षाचा नेता कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? स्टार प्रचारक आयोगच ठरवणार की राजकीय पक्ष, असे प्रश्न उपस्थित करीत सरन्यायाधीशांनी आयोगाला धारेवर धरले.  

या प्रकरणात निवडणूक आयोग लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालय ही शिखर संस्था आहे. न्यायालयाने आयोगाला या प्रकरणात म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. आम्ही लवकरात लवकर म्हणणे मांडू. 

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील सभेत बोलताना कमनाथ यांनी आयटम असे संबोधन वापरले होते. कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. महिला उमेदवाराबद्दल असे विधान केल्याबद्दल कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मुद्द्यावर भाजपही आक्रमक झाला होता आणि कमलनाथ यांच्याविरोधात भाजपने मोहीम उघडली होती. 

कमलनाथ यांना या प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. या नोटिशीला दिलेल्या उत्तरात कमलनाथ यांनी इमरती देवींचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी दोषी ठरवले होते. निवडणूक आयोगाने त्यांना तंबीही दिली होती. आचारसंहितेच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करु नये, अशी ताकीद आयोगाने कमलनाथ यांना दिली होती. 

निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले होते. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला होता. त्यांनी आचारसंहिता भंग केला असून, त्यांना दिलेल्या इशाऱ्याचे उल्लंघन केले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख