काँग्रेसनंतर निवडणूक आयोगाचा भाजपलाही दणका...उच्च शिक्षण मंत्र्यांवर प्रचारबंदी

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणाऱ्या पोटनिवडणुकांचा रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रचारापेक्षा राजकीय नेत्यांकडून व्यक्तिगत चिखलफेकीला जोर आला आहे.
Election Commission bans Madhya Pradesh minister from bypoll campaign for a day
Election Commission bans Madhya Pradesh minister from bypoll campaign for a day

भोपाळ : काँग्रेस नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर कारवाईचा करीत निवडणूक आयोगाने त्यांच्या स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. आता भाजप नेते व मध्य प्रदेशच्या उच्च शिक्षण मंत्र्यावरही निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याला प्रचार करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. आक्षेपार्ह भाषा वापरत त्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा तोडून टाकल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

भाजपचे मंत्री मोहन यादव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यादव यांना निवडणूक आयोगाने आधी नोटीस बजावली होती. या नोटिशीला त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यादव यांना आज दिवसभर प्रचारबंदी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकांचा प्रचार उद्या संपत आहे. 

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, यादव यांनी वापरलेली आक्षेपार्ह भाषा सर्व सभ्यतेच्या मर्यांदापलिकडची आहे. त्यांनी हा आचारसंहितेचा भंग केला आहे. राजकीय नेते म्हणून ते जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी भविष्यात निवडणूक काळात अशा प्रकारची कृती पुन्हा करु नये. यामुळेच त्यांना एक दिवसाची प्रचारबंदी करण्यात येत आहे.  त्यांना आज जाहीर सभा, मिरवणूक, रॅली, रोड शो आणि मुलाखती आदींमध्ये सहभाग घेता येणार नाही. घटनेच्या कलम 324 अंतर्गत मिळालेल्या अधिकारानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.  

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com