बिस्किटामुळे नाराज झालेली शिवसेना अखेर मावळ्यावर खूष - election commission allotted another election symbol for shivsena in bihar election | Politics Marathi News - Sarkarnama

बिस्किटामुळे नाराज झालेली शिवसेना अखेर मावळ्यावर खूष

मंगेश वैशंपायन
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षही बिहारमध्ये रिंगणात उतरले आहेत. 

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत 50 उमेदवार उभे करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) निवडणूक चिन्हाशी मिळतेजुळते असल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले होते. हे निवडणूक चिन्ह बदलण्याची शिवसेनेची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. शिवसेनेला आता तुतारीधारी मावळा हे नवे चिन्ह देण्यात आले आहे. 

धनुष्यबाण हे शिवसेनेचे देशभरात ओळखले जाणारे चिन्ह असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, जेडीयूने त्याला विरोध केला होता. या चिन्हामुळे बिहारमधील मतदार संभ्रमित होऊन त्यांची दिशाभूल होईल आणि त्याचा परिणाम मतदानावर पडेल, असा दावा जेडीयूने केला होता. यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आयोगाने नकार कायम ठेवला आहे.

शिवसेनेला आयोगाने बिहार निवडणुकीसाठी आधी बिस्कीट हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेच्या बिहार शाखेने नाराजी व विरोध दर्शवून ते चिन्ह बदलण्याची मागणी केली होती. आयोगाला शिवसेनेने तुतारीधारी मावळा, धनुष्यबाण, ट्रॅक्‍टरवर बसलेला शेतकरी, बॅट, गॅस सिलेंडर या चिन्हांचे पर्याय दिले होते. यातील तुतारीधारी मावळा या चिन्हावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

भाजपने शिवसेनेच्या बिहारमध्ये निवडणुका लढविण्यावर टीका केली आहे. पक्षनेते आर.के. सिन्हा म्हणाले की, बिहारमध्ये कोणती शिवसेना निवडणूक लढवणार आहे? स्वर्गीय बाळासाहेबांची की सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर काम करणारी शिवसेना? बाळासाहेबांच्या काळातही शिवसेनेने बिहार निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली होती व शिवसेना रिकाम्या हाताने मुंबईला परतली होती. जे स्टार प्रचारक शिवसेनेने जाहीर केले आहेत त्यातील अनेकजण सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मागील चार महिने सातत्याने बिहारविरूध्द बोलत आहेत.

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल  (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख