कमलनाथांवर कारवाईचा अधिकारच नाही...निवडणूक आयोगाविरोधात दिग्विजयसिंह आक्रमक

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे प्रचारासह नेत्यांच्या चिखलफेकीलाही जोर आला आहे.
election commission action on kamal nath is wrong says digvijay singh
election commission action on kamal nath is wrong says digvijay singh

भोपाळ : माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारक हा दर्जा काढून घेतला आहे. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आयोगाला अशी कारवाई करण्याचा अधिकारच नाही, असा दावा काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. 

मध्य प्रदेशात काँग्रेसची सगळी भिस्त कमलनाथ यांच्यावर आहे. त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढल्याचे काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. या प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. या प्रकरणी काँग्रेसकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. 

काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने दबावाखाली हा निर्णय घेतला असून, तो योग्य नाही. स्टार प्रचारकांची यादी तयार करण्याचा अधिकार राजकीय पक्षांना असतो. तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील विषय नाही. निवडणूक आयोगाने स्वत:च्याच मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे.  

या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. याविषयी बोलताना मध्य प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा म्हणाले की, पक्षाचे नेते कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला पक्ष आव्हान देणार आहे. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. 

मलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील सभेत बोलताना कमनाथ यांनी आयटम असे संबोधन वापरले होते. कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिला उमेदवाराबद्दल असे विधान केल्याबद्दल कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावर भाजपही आक्रमक झाला असून, कमलनाथ यांच्याविरोधात भाजपने मोहीम उघडली आहे. 

कमलनाथ यांना या प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. या नोटिशीला दिलेल्या उत्तरात कमलनाथ यांनी इमरती देवींचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी दोषी ठरवले होते. निवडणूक आयोगाने त्यांना तंबीही दिली होती. आचारसंहितेच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करु नये, अशी ताकीद आयोगाने कमलनाथ यांना दिली होती. 

आता निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यांनी आचारसंहिता भंग केला असून, त्यांना दिलेल्या इशाऱ्याचे उल्लंघन केले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

आता कमलनाथ हे स्टार प्रचारक नसल्याने त्यांना स्वत:च्या पैशाने प्रवास आणि निवासासह इतर व्यवस्था करावी लागेल. याचबरोबर निवडणुकीशी निगडित खर्चही त्यांनाच करावा लागेल. स्टार प्रचारकाचा खर्च हा पक्ष करीत असतो आणि तो अमर्यादित असू शकतो. आता कमलनाथ यांचा हा दर्जाच काढून घेण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com