वद्रांच्या अडचणीत वाढ, ताब्यात घेण्यासाठी ईडीची न्यायालयात धाव - ED moves to Rajsthan high court for Robert vadras custodial interrogation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

वद्रांच्या अडचणीत वाढ, ताब्यात घेण्यासाठी ईडीची न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
रविवार, 17 जानेवारी 2021

न्यायालयामध्ये या अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. बेनामी मालमत्ता प्रकरणात वद्रा यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.

जोधपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती व उद्योजक रॉबर्ट वद्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

न्यायालयामध्ये या अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. बेनामी मालमत्ता प्रकरणात वद्रा यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. याचप्रकरणात त्यांच्यासह महेश नागर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी ईडीने न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये केटीएस तुलसी हे वद्रा यांची बाजू मांडणार आहेत. 

वद्रा यांनी 2007 मध्ये स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. रॉबर्ट वद्रांसह त्यांच्या मातोश्री मौरीन या कंपनीच्या संचालक पदावर आहेत. नोंदणीवेळी ही कंपनी  बार, रेस्टॉरंट आणि कँटीन चालविण्याच्या क्षेत्रात उतरणार असल्याचे सांगितले जात होते. 

कंपनीने २०१२ साली जोधपूरच्या कोलायत येथे 270 बिघा जमीन केवळ 79 लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. ही जमीन बिकानेर येथील भारतीय सेनेच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी देण्यात आली होती. तर येथून विस्थापित झालेल्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी 1400 बिघा जमीन देण्यात आली होती. मात्र, काही जणांनी या जमिनीची खोटी कादगपत्रे तयार करुन ती वद्रांच्या कंपनीला विकल्याचा आरोप होत आहे. 

दरम्यान, राजस्थानमधील बिकानेर येथील मालमत्तेप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉबर्ट वद्रा यांची नुकतीच सलग दोन दिवशी चौकशी केली होती. वद्रा यांच्या कार्यालयातून तब्बल 23 हजार कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, ईडीने त्यांची 13 वेळा चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख