'डीआरडीओ'चे कोरोनावरील 2-डीजी औषध घेताय? आधी या इशाऱ्याकडे लक्ष द्या...

संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने कोरोनावर 2-डीजी हे नवीन औषध आणले आहे.
drdo release guidelines for use of covid 19 drugs 2 dg
drdo release guidelines for use of covid 19 drugs 2 dg

नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Covid19) दुसरी लाट आली आहे. या परिस्थितीत संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने (DRDO) कोरोनावर 2-डीजी (2-DG) हे नवीन औषध आणले आहे. या औषधाच्या वापराबाबत डीआरडीने नियमावली जाहीर केली आहे. मधुमेह, हृदयविकारासह इतर आजार असणाऱ्यांना हे औषध वापरताना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

डीआरडीओ आणि हैदराबादस्थित डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीने हे 2-डिऑक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) हे औषध विकसित केले आहे. हे औषध पावडर स्वरुपात सॅशेमध्ये येते आणि पाण्यात मिसळून ते घ्यावे लागते. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्याच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय औषध महानियंत्रकांनी घेतला आहे. हे औषध घेतलेले बहुतांश रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत. या औषधामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण लवकर बरे होतात आणि त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची फारशी आवश्यकता भासत नाही. 

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते 17 मे रोजी हे औषध सादर करण्यात आले होते. मध्यम ते तीव्र लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी या औषधाच्या तातडीच्या वापरास सरकारने परवानगी दिली आहे. आता डीआरडीओने ट्विटवर या औषधाच्या वापराबाबत नियमावली दिली आहे. औषध महानियंत्रकांनी दिलेल्या मंजुरीनुसार ही नियमावली देण्यात आली आहे. 

डीआरडीओच्या नियमावलीनुसार, 2-डीजी औषध हे मध्यम ते तीव्र लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना लवकरात लवकर डॉक्टरांनी देण्यास सुरवात करावे. हे औषध 10 दिवसांपर्यंत द्यावे. अनियंत्रित मधुमेह, हृदयविकार, श्वसन विकार असलेल्या रुग्णांवर या औषधाचा काय परिणाम होतो हे अभ्यासण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी हे औषध घेताना काळजी घ्यावी. गर्भवती, स्तनदा माता आणि 18 वर्षांखालील व्यक्तींनी हे औषध घेऊ नये. औषधाच्या पुरवठ्यासाठी रुग्णालयांनी डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीशी संपर्क साधावा. 

या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबरमध्ये झाल्या. यात हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले. तसेच, औषध घेतलेले रुग्ण लवकर बरे होत असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या 110 रुग्णांवर तर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 6 रुग्णालयात झाल्या होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com