dpa act invoked by donald trump is responsible for restriction of raw material export to india
dpa act invoked by donald trump is responsible for restriction of raw material export to india

'सिरम'सह इतर भारतीय कंपन्यांना लशीचा कच्चा माल न मिळण्यास ट्रम्पच कारणीभूत

देशात कोरोना लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच अमेरिका आणि युरोपने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल रोखून धरला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच अमेरिका आणि युरोपने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल रोखून धरला आहे. यामुळे लशीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. यामुळे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी थेट अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडन यांच्याकडे मदतीची याचना केली होती. यावर बायडन यांनी भूमिका स्पष्ट केली असून, यातून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय यासाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

भारताला लशीचा कच्चा माल अमेरिकेकडून मिळत नसल्याबद्दल जो बायडन यांनी भारत सरकारला कळवले आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे बायडन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यामागे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेतलेला निर्णय यासाठी कारणीभूत असल्याचेही समोर आले आहे. 

ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात युद्धसमयी लावला जाणारा संरक्षण उत्पादन कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार, अमेरिकी कंपन्यांना आधी देशातील कोरोना लस आणि पीपीई किटच्या उत्पादनास प्रधान्य द्यावे लागते. अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर ट्रम्प यांनी कायदा लागू केला होता. 

आता अमेरिकेतील कंपन्यांनी देशातील संपूर्ण लोकसंख्येला पुरेल एवढ्या कोरोना लशीचे उत्पादन पूर्ण होत आले आहे. फायजर आणि मॉडर्ना या कंपन्यांच्या यात प्रामुख्याने समावेश आहे. अमेरिकेतील सर्व जनतेचे लसीकरण 4 जुलैपर्यंत पूर्ण होईल. यामुळे लवकरच कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकी कंपन्या जगभरातील लस कंपन्यांना कच्चा माल पुरवू शकतील, अशी शक्यता आहे. 

याआधी अदर पूनावाला यांनी याबाबत ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेचे आदरणीय अध्यक्ष जो बायडन, आपण सर्वांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे. अमेरिकेने लशीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध उठवावेत. असे घडल्यास लस उत्पादनाचा वेग वाढेल. तुमच्या प्रशासनाकडे यासंदर्भातील सर्व तपशील आहेत. 

युरोप आणि अमेरिकेने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे भारतातील कोरोना लशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मला शक्य असते तर मीच अमेरिकेत जाऊनही याचा निषेध नोंदवला असता. अमेरिका आणि युरोपने भारत आणि इतर देशांतील कोरोना लस उत्पादनासाठीचा कच्चा माल रोखून धरला आहे, असे आधी पूनावालांनी स्पष्ट केले होते. 

हा कच्चा माल सद्य:स्थितीत अतिशय आवश्यक आहे. हा माल आपल्याला तातडीने हवा आहे. तो सहा महिने अथवा वर्षाने नको आहे. एवढा वेळ असता तर आपणच दुसऱ्या पुरवठादारांकडून हा माल तयार करुन घेतला असता. कोव्हिशिल्डसोबत कोव्हॅक्सिनच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला आहे. हा माल चीनमधून आयात करण्याचा कोणताही विचार नाही. कारण त्या मालाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित होतो, असेही पूनावाला यांनी म्हटले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com