भाजपकडून सत्तेचा गैरवापर...तमिळनाडूतील राजकारण पेटले - dmk president m k stalin and other parties oppose abvp president apoointment on aiims | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपकडून सत्तेचा गैरवापर...तमिळनाडूतील राजकारण पेटले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबय्या शण्मुगम यांची प्रस्तावित मदुराई एम्सवर वर्णी लावण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीवरुन मोठा गदारोळ उडाला आहे. 

चेन्नई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबय्या शण्मुगम यांची मदुराईतील प्रस्तावित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) सदस्यपदी निवड करण्यात  आली आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या  डॉ. शण्मुगम यांच्या नियुक्तीवरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्यासह एमडीएमकेचे नेते वैको आणि इतर पक्षांच्या खासदारांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. 

डॉ. शण्मुगम हे किलपोक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रोयापेट्टा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेचे सहसचिव सुनील शर्मा यांनी डॉ. शण्मुगम यांच्या मदुराई 'एम्स'वरील नियुक्तीचा आदेश 15 ऑक्टोबरला काढला आहे. एम्सच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक, संस्थेचे संचालक आणि तमिळनाडूच्या मुख्य सचिवांचा समावेश आहे. 

डॉ. शण्मुगम काही दिवसांपूर्वी त्यांच्या पराक्रमामुळे अडचणीत आले होते. त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या दारावर त्यांनी किरकोळ भांडणातून मूत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते आणि शण्मुगम यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अखेर तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने या प्रकरणावर पडदा पडला होता. 

द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी तातडीने डॉ. शण्मुगम यांची एम्स सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्या जागी तमिळनाडूतील खासदाराची नियुक्ती करावी, असे त्यांनी म्हटले आहे. स्टॅलिन म्हणाले की, एम्सची उभारणी करदात्यांचा पैशातून होत असून, भाजपच्या पक्ष फंडातून नाही. डॉ. शण्मुगम यांची नियुक्ती करुन भाजपने सत्तेचा मोठा गैरवापर केला आहे. भाजप महिलांचा आदर करीत नाही हे या नियुक्तीतून दिसून आले आहे. 

या प्रकरणी एमडीएमकेचे सरचिटणीस वैको यांनीही भाजपला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एम्सवरील शण्मुगम यांच्या नियुक्ती तातडीने मागे घ्यायला हवी. त्यांची नियुक्ती करुन एम्ससारख्या मोठ्या संस्थेचा एकप्रकारे अपमानच करण्यात आला आहे. 

या नियुक्तीला काँग्रेसचे खासदार बी.मनिकम आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सु. वेंकटेशन यांनीही विरोध केला आहे. अतिशय खालच्या पातळीवरील वर्तन केले म्हणून की राष्ट्रीय स्वयंसंघाशी संबंध आहे म्हणून डॉ. शण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली, असा सवालही त्यांनी केला आहे. 

शण्मुगम यांच्याविरोधात आडम्बक्कम पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २७१ ( जाणीवपूर्वक नियमांचा भंग करणे) आणि ४२७ ( नुकसान करण्याच्या हेतूने कृती करणे ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचबरोबर तमिळनाडू महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल झाला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख