वाद रामदेवबाबांच्या कोरोनीलचा अन् जुंपली डॉक्टरांच्यात..!

रामदेवबाबांच्या कोरोनील औषधावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. यावरुन आता डॉक्टरांच्यातच जुंपल्याचे चित्र आहे.
dma oppose ima over ramdev baba coronil medicine
dma oppose ima over ramdev baba coronil medicine

नवी दिल्ली : योगगुरु रामदेवबाबा यांच्या कोरोनील या कोरोनावरील आयुर्वेदिक औषधावरून मोठा गदारोळ सुरू आहे. या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ)  मान्यता असल्याचा दावा रामदेवबाबांच्या पतंजलीने केला होता. मात्र,  जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या खुलाशानंतर हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले होते. या औषधावरुन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना जाब विचारला होता. आता यावरुन दिल्ली मेडिकल असोसिएशन (डीएमए) आणि तिची मातृसंस्था असलेल्या आयएमएमध्ये जुंपली आहे.  
रामदेवबाबांच्या पतंजली उद्योगसमूहाने बनविलेल्या कोरोनील या कथित आयुर्वेदिक औषधाला मान्यता दिलेली नाही, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले. मात्र, त्याआधीच देशाचे आयुष मंत्रालय या औषधाला मान्यता प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले होते. हे औषध जाहीरपणे सादर करताना डॉ. हर्षवर्धन व नितीन गडकरी यांच्यासारखे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री हजर होते. त्यावरून आयएमएने एक पत्र पाठवून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. 

आयएमएने केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना जाब विचारल्यावरून आयएमएचाच भाग असलेल्या डीएमएने विरोधात भूमिका घेतली आहे. डॉ. हर्ष वर्धन यांना विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचे डीएमएने म्हटले आहे. देशाच्या आरोग्यमंत्र्यांचा हा अपमान असल्याचा दावाही डीएमएने केला आहे. डॉ. हर्ष वर्धन हे डीएमएचे संस्थापक सदस्य आहेत.

रामदेवबाबांच्या कथित कोरोना औषधाने आयएमएमध्येच फूट पडली आहे. याबाबत बोलताना डीएमएचे अध्यक्ष डॉ. बी.बी वाधवा म्हणाले की, आम्ही आयएमएच्या विरोधात नाही. त्यांनी डॉ. हर्ष वर्धन यांच्याबाबत केलेल्या विधानाला आमचा आक्षेप आहे. हर्ष वर्धन हे देशाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना अनेक कार्यक्रमांना जावे लागते. याचा अर्थ त्यांची संबंधित औषधांना मान्यता असते, असा नाही. स्वतः हर्ष वर्धन यांनी कोरोनील वापरण्याचे वक्तव्य केलेले नाही. 

एखाद्या आयुर्वेदिक कंपनीने कोरोनावर औषध बनविले आणि देशातील यंत्रणांनी त्याला मान्यता प्रमाणपत्र दिल्यास त्याचे स्वागत करायला हवे. आज कोरोनावर जेथे मिळेल तेथून औषध विकसित करणे आवश्‍यक बनले आहे. यावरून डॉ. हर्ष वर्धन यांना विनाकारण लक्ष्य करणे चुकीचे आहे. आयएमएकडून हेच सुरू असल्याने आम्ही केवळ त्या पत्रातील संबंधित भागाचा निषेध केला आहे, असे डॉ. वाधवा यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in