ओएनजीसीची बार्ज सुमद्रात होतीच कशी? कर्मचाऱ्यांचा मृत्यूला कोण जबाबदार? अखेर चौकशीचे आदेश

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळामुळे ऑईल अँड नॅचरल गॅसची बार्ज बुडाली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Directorate General of Shipping ordered investigation into the deaths ONGC employees
Directorate General of Shipping ordered investigation into the deaths ONGC employees

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) ऑईल अँड नॅचरल गॅसची (ONGC) बार्ज बुडाली होती. या बार्जवर तब्बल 261 कर्मचारी होते. यातील 186 जणांची नौदलाने (Navy) सुटका केली. या बार्जवरील 38 कर्मचारी चार दिवसांनंतरही अद्याप बेपत्ता असून, 37 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. चक्रीवादळाचा इशारा असतानाही ही बार्ज समुद्रात राहिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला असून, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

ओएनजीसीची तेल उत्पादन करणारी बार्ज पी-305 आज चक्रीवादळामुळे मुंबईपासून 34 सागली मैल अंतरावर बॉम्बे हाय येथे सुरक्षित अंतरावर उभी करण्यात आली होती. परंतु, चक्रीवादळामुळे तिचा अँकर सुटला आणि ती समुद्रात भरकटली आणि बुडाली. त्यावेळी बार्जवर 261 कर्मचारी होते. अखेर नौदलाला तातडीने संदेश पाठवण्यात आला. नौदलाच्या जहाजांनी मदत कार्य सुरू केले. आतापर्यंत 186 जणांची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. तसेच, 37 मृतदेह हाती लागले आहेत. अजून 38 कर्मचारी बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

तौते चक्रीवादळाची पूर्वसूचना आधीच देण्यात आली होती. असे असताना ओएनजीसीच्या तीन बार्ज आणि एक जहाज समुद्रात होते. या बार्ज आणि जहाज वादळामुळे समुद्रातून बाहेर का काढण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर त्यांच्यावरील शेकडो कर्मचारी आधीच का हलवण्यात आले नाहीत, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहेत. या दुर्घटनेची दखल घेऊन जलवाहतूक महासंचालनालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. याचबरोबर ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनीही अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

बार्ज पी -305 ही बार्ज बुडाली होती तर गॅल कन्स्ट्रक्टर आणि सपोर्ट स्टेशन या बार्जही भरकटल्या होत्या. गॅल कन्स्ट्रक्टरवरील 137 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.  सपोर्ट स्टेशन-3 वर 201 कर्मचारी होते. याचबरोबर ओएनजीसीचे तेल उत्पादनासाठी ड्रिलिंग करण्यास वापरण्यात येणारे जहाजही भरकटले आहे. त्यावर 101 कर्मचारी होते. हे सर्व कर्मचारी सुखरुप असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे. 
नौदलाकडून युद्धपातलळीवर बचावकार्य सुरू आहे. हे बचावकार्य दिवसरात्र सुरू असून, यात नौदलाची अनेक जहाजे सहभागी झाली आहेत. याचबरोबर अनेक सी किंग हेलिकॉप्टरचाही यात समावेश आहे. किनारा रक्षक दल आणि ओएनजीसीच्या जहाजांच्या मदतीनेही शोधकार्य सुरू आहे. बुडालेल्या पी-3-75 बार्जवरील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू आहे. 

ओएनजीसी समुद्रात खोदकाम करुन तेलाचे उत्पादन घेते. अरबी समुद्रात यासाठी बार्जचा वापर केला जातो. या बार्जवरील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून नेले जाते. ओएनजीसी अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिवसाला 50 हजार बॅरलपर्यंत तेलाचे उत्पादन घेते. बॉम्बे हाय हे अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या मालकीचे तेलक्षेत्र आहे. 

तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात 6 जणांचा, गुजरातमध्ये 2 जणांचा आणि कर्नाटकात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी हजारो घरांचे नुकसान झाले असून, विजेचे खांब मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले आहेत. वादळामुळे हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. 

मागील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुरूवातीला या वादळाची तीव्रता कमी होती. पुढे सरकत असतानाच वादळाची तीव्रता वाढत गेली आणि नंतर वादळाने रौद्र रुप धारण केले होते. मागील दोन दिवसांत केरळ, कर्नाटक व गोव्याला वादळाने जोरदार तडाखा दिला. नंतर वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून पुढे गेले. मुंबई, कोकण, ठाणे या भागांसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. विजेचे खांब पडले असल्याने काही भागातील वीजपुरवठा बंद झाला आहे.

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com