कॉम्प्युटर बाबांचा आश्रम पाडून भाजपने सुडाची परिसीमा गाठली...

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणार पोटनिवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कॉम्प्युटर बाबांना भाजपने दणका दिला आहे.
digivijay singh slams bjp government over demolition of computer baba ashram
digivijay singh slams bjp government over demolition of computer baba ashram

भोपाळ : मध्य प्रदेशातील मिनी विधानसभा ठरलेल्या 28 मतदारंसघातील पोटनिवडणुकांत भाजपला 17 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. उद्या निवडणुकीची मतमोजणी होत असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कॉम्प्युटर बाबांचा आश्रम भाजप सरकारने जमीनदोस्त केला आहे. यावरुन काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.  

नामदेव दास त्यागी ऊर्फ कॉम्प्युटर बाबा हे अतिशय प्रसिद्ध आहेत.भाजप सरकारने 2018 मध्ये त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला होता. त्यांचा इंदोर जिल्ह्यातील जांम्बुर्डी हापसी गावात 43 एकरवर आश्रम होता. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने त्याच्यावर कारवाई करीत तो जमीनदोस्त केला. बाबांना 2000 साली ही जमीन गोशाळा स्थापन करण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, बाबांनी त्या जागेवर दोन एकरात आश्रम बांधला होता. यासाठी त्यांनी 80 कोटी रुपये खर्च केले होते. 

बाबांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत काँग्रेसचा प्रचार केला होता. यामुळे या कारवाई भाजप सरकारने आकसातून केल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. नोटीस बजावूनही त्यांनी अतिक्रमण हटविले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्याजागी आता गोशाळा उभारण्यात येणार आहे. 

पोलिसांनी कॉम्प्युटर बाबांसह सहा जणांना आश्रम पाडण्यास विरोध केला म्हणून अटक केली आहे. त्यांनी भेटण्यासाठी काही काँग्रेस नेते तुरुंगातही जाणार आहेत. या मुद्द्यावर काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दिग्विजयसिंह यांच्या प्रचारातही बाबा उतरले होते. ते म्हणाले की, सुडाच्या भावनेतून इंदोरमध्ये कॉम्प्युटर बाबांचा आश्रम तोडण्यात आला. या आश्रमाला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. ही राजकीय सुडाची परिसीमा आहे. मी याचा निषेध करतो. 

एक्झिट पोलनुसार, राज्यात काँग्रेसचे सत्तांतर करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. काँग्रेस नेते कमलनाथ हे या निवडणुकीत भाजप नेते जोतिरादित्य शिंदेंना धक्का देण्यात यशस्वी ठरले तरी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या खुर्चीला मात्र, कोणताही धोका नसल्याचे एक्झिट पोलमध्य समोर आले आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 25 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता हे सर्व आमदार भाजपच्या तिकिटावर उभे असून, तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका झाल्या. 

एक्झिट पोलनुसार, भाजपला 28 पैकी 17 जागा मिळतील. काँग्रेसला 11 जागा मिळतील. याचा फटका जोतिरादित्य शिंदे यांचा समर्थक आमदारांना बसणार आहे. कमलनाथ हे जोतिरादित्य शिंदे यांना धक्का देण्यात यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिवराजसिंहाची खुर्ची हलेल हा एवढा मोठा धक्का असणार आहे, असेही चित्र दिसत आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com