फडणवीस म्हणतात, आमचे नेते नितीशकुमारच..! - devendra fadnavis says nitish kumar will be chief minister of bihar | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस म्हणतात, आमचे नेते नितीशकुमारच..!

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप नेत्यांनी नितीश यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच असतील हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाने बिहारमध्ये प्रभारी नेमले होते. फडणवीस यांनीही नितीशकुमारच नेते असतील, असे जाहीर केले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांका वर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. आता अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले आहे. 

बिहारमधील भाजपच्या कामगिरीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. संपूर्ण देश कोरोनाशी लढत होता तेव्हा नरेंद्र मोदींना सर्वसामान्य नागरिकांची चिंता करत होते. बिहारमध्ये जातीय समीकरणे वेगळी आहेत. प्रत्येक मतदारसंघात वेगळा प्रभाव दिसून येतो. ती समीकरणे हातळणे आणि तिथे मागासवर्ग मोठ्या प्रमाणात असून, त्यांना कोणते प्रतिनिधी द्यायचे याचा समतोल साधताना कसोटी पणाला लागली.

काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांच्या ट्विटकडे दुर्लक्ष करा. नितीशकुमार कुठेही जाणार नाहीत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सरकार स्थापन होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मी केंद्रीय राजकारणात जाणार नाही. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार आहे. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात राहणार असल्याचेही सूतोवाच त्यांनी केले. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख