एक्झिट पोल काहीही म्हणोत पण आम्हीच बिहार जिंकणार; भाजपचा विश्वास - despite exit polls predicting defeat bjp says NDA will win in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

एक्झिट पोल काहीही म्हणोत पण आम्हीच बिहार जिंकणार; भाजपचा विश्वास

वृत्तसंस्था
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव हे सत्तास्थापना करतील, असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात येत आहेत. भाजपने मात्र, हे अंदाज फेटाळून लावले आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) - काँग्रेसच्या महाआघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच राहणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे पारडे जड दिसत आहे. भाजपने मात्र, एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावले आहेत. 

एक्झिट पोलचा कौल भाजपने अमान्य केला आहे. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचीच सत्ता येईल, असा दावा भाजपने केला आहे. भाजपचे  प्रवक्ते सईद जाफर इस्लाम म्हणाले की, बूथ पातळीवर अहवाल सांगतो की एनडीए पुन्हा मोठ्या संख्याबळासह सत्तेवर येईल. भाजप आणि जेडीयू पुरेशा जागा मिळवून बिहारमध्ये सत्तास्थापना करतील. बूथ पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन अचूक अहवाल दिले आहेत. 

मी एक्झिट पोलच्या विरोधात नाही. बिहारमध्ये सुमारे 12 कोटी मतदार आहेत. याचवेळी एक्झिट पोल घेणाऱ्या संस्था अतिशय कमी मतदारांचे सर्वेक्षण करतात. यामुळे आम्ही आशावादी आहोत. निकाल केवळ 48 तासांवर आले आहेत. आम्हाला राज्यात मोठा विजय मिळेल आणि एनडीए अतिशय सहजपणे बिहारमध्ये सरकार स्थापन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मोठे यश मिळेल. महाआघाडीतील आरजेडी 180, काँग्रेस 11 जागा आणि एनडीएतील भाजप 55 आणि जेडीयू 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इतर पक्षांना 8 आणि अपक्षांना 4 जागा मिळतील, असेही म्हटले आहे. 

ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 114, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्षाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 115, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्ष 4 आणि इतरांना 4 जागा मिळतील. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा आज झालाअसून, यात ७८ मतदारसंघ होते. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख