आयाराम गयाराम..दहा वर्षांत एकाही नेत्यावर पक्षांतरबंदीची कारवाई नाही - despite defections no disqualification in bengal assembly in decade | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आयाराम गयाराम..दहा वर्षांत एकाही नेत्यावर पक्षांतरबंदीची कारवाई नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

मागील 10 वर्षांत पक्षांतर बंदीनुसार एकाही लोकप्रतिनिधीवर राज्यात कारवाई झालेली नाही हे वास्तव आहे. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपला (BJP) गळती लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) यांची नुकतीच तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) घरवापसी झाली आहे. मुकुल रॉय हे आमदार म्हणून निवडून आले त्यांची असून, त्यांची आमदारकी रद्द करावी, यासाठी भाजपने आक्रमक मोहीम सुरू केली आहे. असे असले तरी मागील 10 वर्षांत पक्षांतर बंदीनुसार (Defecation) एकाही लोकप्रतिनिधीवर राज्यात अपात्रतेची (Disqualification) कारवाई झालेली नाही हे वास्तव आहे. 

विधानसभेचे तीन वेळा अध्यक्षपद भूषवणारे बिमान बॅनर्जी यांनीच याची कबुली दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षांतर करणाऱ्या एकाही आमदारावर मागील 10 वर्षांत पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई झालेली नाही. विधानसभेत 2011 पासून असा एकही प्रकार घडलेला नाही. याबद्दल मी अधिक तपशीलात माहिती देऊ शकत नाही. 

तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यापासून राज्यात पक्षांतर ही नेहमीची गोष्ट आहे. राज्यात 2011 ते 2021 या काळात काँग्रेस, डावी आघाडी आणि तृणमूलच्या चार डझनहून अधिक आमदारांनी पक्ष बदलला आहे. सोळाव्या विधासभेत काँग्रेसच्या 44 पैकी 24, डाव्यांच्या 32 पैकी 8 आमदारांनी तृणमूल अथवा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत 12 आमदारांना अपात्र ठरवावे, यासाठी काँग्रेसने अर्ज केले असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक अर्ज केलेला आहे. 

हेही वाचा : फडणवीसांच्या संन्यासाला खडसेंचाच विरोध 

अनेक वेळा राजकीय पक्षांनी विधानसभेतील मुख्य विरोधी पक्षाचे स्थान हिरावले जाऊ नये म्हणून पक्षांतर केलेल्या सदस्यांना अपात्र ठरवणण्याची मागणी केलेली नव्हती. याबद्दल बोलताना माजी विरोधी पक्षनेते अब्दुल मानन म्हणाले की, केंद्रातील भाजप आणि राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारच्या काळात पक्षांतरबंदी कायदा हा विनोद ठरला आहे. अनेक वर्षे दाखल झालेल्या अपात्रतेच्या अर्जांवर अध्यक्षांकडून निर्णयच घेतले गेले नव्हते. विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष म्हणून आमचे स्थान हिरावले जाईल म्हणून आम्हीही असे अर्ज केले नव्हते.  

भाजप नेते सुवेंदू अधिकारींनी मुकुल रॉय यांना अपात्र ठरवावे, यासाठी विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुकुल रॉय यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवावे. रॉय हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले असून, नंतर ते तृणमूलमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांना आमदारपदी राहण्याचा अधिकार नाही. 

मुकुल रॉय हे भाजपच्या तिकिटावर कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी हे तृणमूलच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीआधी सुवेंदू यांच्यासोबत शिशिर अधिकारीही भाजपमध्ये गेले होते. त्यांनी अद्याप खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. रॉय यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सुवेंदू अधिकारींनी केल्यानंतर तृणमूलने शिशिर अधिकारींचा मुद्दा उपस्थित केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख