
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (satyendra jain) हे सध्या ईडीच्या (ed) कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीत आणखी पाच दिवस वाढ करण्यात आली आहे. कोठडीत वाढ केल्यानंतर न्यायालयातून बाहेर पडताच जैन यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना ईडीच्या पथकाने आरएमएल रुग्णालयात दाखल केले आहे.
ईडीने ३० मे रोजी त्यांना अटक केली होती. ३१ मे ला जैन यांना ९ जून पर्यंत ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली होती. जैन यांची आणखी चौकशी करायची आहे,असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. प्रकरणाच्या तपासादरम्यान २.८५ कोटींची रोख मिळाली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी जैन यांना न्यायालयात हजर केले.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले सत्येंद्र जैन यांच्या ईडी कोठडीत राउस एवेन्यू न्यायालयाने १३ जून पर्यंत वाढ केली आहे. सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
यापूर्वी एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, २००२ अंतर्गत जैन यांच्या कुटुंबाची आणि कंपन्यांची ४.८१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या मालमत्तेचा समावेश आहे.
काळा पैसा पांढरा केला
जैन यांनी दिल्लीत अनेक शेल कंपन्या सुरू केल्याचा किंवा खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यासोबतच कोलकाता येथील तीन हवाला ऑपरेटर्सच्या ५४ शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी १६.३९ कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. जैन यांच्याकडे प्रयास, इंडो आणि अकिंचन या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात होते.
गुरुवारी सुनावणी दरम्यान ईडीने जैन यांच्या ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तर, जैन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी याला विरोध केला. २०१५ मध्ये केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर जैन यांचे सर्व शेअर्स त्यांच्या पत्नीच्या नावाने करण्यात आल्यात.
प्रकरणाचा तपास सीबीआय कडून २०१६ पासून सुरू आहे. आतापर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. ईडीचे हे कार्यक्षेत्र नसून ते या प्रकरणात तपास करू शकत नाहीत असा युक्तीवाद करीत सिब्बल यांनी जैन यांच्या पाच दिवसांच्या कोठडीला विरोध दर्शवला. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने जैन यांच्या कोठडीत पाच दिवसांनी वाढवली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.