चिराग पासवान न्यायालयीन लढाई हरले; काका पारस अखेर जिंकले - delhi high court rejects chirag paswan petition against pashupati kumar paras | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

चिराग पासवान न्यायालयीन लढाई हरले; काका पारस अखेर जिंकले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार झाला आहे. या विस्तारात लोक जनशक्ती पक्षात फूट पाडणारे खासदार पशुपतीकुमार पारस यांनाही स्थान देण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. या विस्तारात लोक जनशक्ती पक्षात (LJP) फूट पाडणारे खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांनाही स्थान देण्यात आले आहे. पारस यांच्या विरोधात लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, उच्च न्यायालयाने चिराग यांची याचिका फेटाळून लावली आहे. 

लोकसभा अध्यक्षांनी पारस यांना पक्षाचे संसदीय नेते म्हणून मान्यता दिली आहे. या विरोधात चिराग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत तथ्य दिसत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे चिराग यांना मोठा धक्का बसला आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी 7 जुलैला शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. यामध्ये पासवान यांच्याजागी त्यांचे बंधू पारस यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. परंतु, चिराग पासवान यांनी त्यावरच आक्षेप घेतला होता.

पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यामुळे चिराग हे भाजपपासून आणखी दुरावले जाण्याची शक्यता आहे. याआधी बोलताना चिराग पासवान यांनी म्हटले होते की, पशुपतीकुमार पारस यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्यामुळे आणि पक्ष नेतृत्वाची फसवणूक केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाचाही समावेश करु शकतात. परंतु, आमच्या पक्षाचा विचार करता पारस हे आता सदस्यही नाहीत. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्यास आमच्या याच्याशी संबंध असणार नाही. 

हेही वाचा : गेहलोत-पायलट वादावर फॉर्म्युला ठरला...मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाऊन सुरू 

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाची धुरा सांभाळत आहेत. चिराग यांच्याविरोधात पारस यांनी उघड बंड पुकारले होते. लोक जनशक्ती पक्षातील या फुटीमागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत चिराग यांच्यामुळे नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाला मोठा फटका बसला होता. यामुळे चिराग यांच्याविरोधात नितीशकुमारांची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख