मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रातील नागरिकांना राज्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. यापाठोपाठ गुजरात, मध्य प्रदेश आणि आता दिल्लीने महाराष्ट्रातीन नागरिकांना प्रवेश नाकारण्यास सुरवात केली आहे. एकाचवेळी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्लीने नाकेबंदी केल्याने महाराष्ट्राची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. यामुळे सर्वच राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. यावर कडी करत कर्नाटकचे आरटी-पीसीआर चाचणीने निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. याचीच री ओढत गुजरात आणि मध्य प्रदेशने महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेशावर निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. आता दिल्लीनेही महाराष्ट्रातील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.
गुजरात आणि मध्य प्रदेशने महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांची सीमांवर तपासणी करण्यास सुरवात केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच, सीमांवर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. आता दिल्लीनेही महाराष्ट्रातील नागरिकांच्या अडचणीत वाढ केली आहे.
महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश व पंजाब या पाच राज्यांतून दिल्लीत येणाऱ्यां नागरिकांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल. या पाच राज्यांतून सार्वजनिक वाहतुकीने दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा ७२ तासांपर्यंतचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवला तरच प्रवेश मिळेल. हा अहवाल दाखविणार नाहीत त्यांना दिल्लीत नो एंट्री असणार आहे. केंद्र व दिल्ली राज्य सरकारचा हे निर्बंध १५ मार्चपर्यंत लागू राहणार आहे.
येत्या २६ फेब्रुवारीला रात्री १२ ते १५ मार्च दुपारी १२ या काळात रेल्वे, विमान, बस आदींतून दिल्लीत येणाऱ्या साऱ्या प्रवाशांसाठी हा नियम लागू असेल. मात्र, खासगी मोटार वा अन्य वाहनांनी येणाऱ्यांना दिल्लीतील प्रवेशासाठी कोणताही अहवाल दाखवावा लागणार नाही. अन्य राज्यांतील कोरोना रुग्णांमुळे दिल्लीतील कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर होऊ नये यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे पाच राज्यांतील प्रवाशांना सरसकट प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Edited Sanjay Jadhav

