`आप`च्या अडचणी वाढल्या; सिसोदिया यांना कधीही होऊ शकते अटक!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याभोवती मोदी सरकारच्या तपास यंत्रणांनी वेढा गच्च आवळला आहे.
Manish Sisodia
Manish Sisodiasarkarnama

Manish Sisodia : नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याभोवती मोदी सरकारच्या तपास यंत्रणांनी वेढा गच्च आवळला असतानाच. सिसोदिया यांनी, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना रोखण्यासाठीच भाजप (BJP) नेतृत्व आपल्याला 'बळी' देत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की केजरीवाल यांच्या प्रमाणिक प्रतिमेची देशभरात हवा असून भाजप नेतृत्व त्यांना प्रचंड घाबरले आहे.

आता २०२४ ची लोकसभा निवडणूकीची लढत 'मोदी विरूध्द केजरीवाल' अशी होईल असेही भाकीत त्यांनी वर्तविले. यावर भाजपने, केजरीवाल यांच्या २०१४ पासूनच्या पंतप्रधानपदाच्या सुप्त महत्वाकांक्षेने पुन्हा उसळी घेतली आहे, असा उपरोधिक प्रतिहल्ला चढविला.

दिल्लीतील वादग्रस्त अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याबद्दल सिसोदिया यांची सीबीआयने (CBI) काल तब्बल १४ तास चौकशी केल्यावर या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) एन्‍ट्री होणे निश्चित आहे. सिसोदिया यांच्याविरूध्दचे आरोप व सीबीआयकडील पुरावे पहाता पुढच्या काही दिवसांत किंबहुना तासांतही सिसोदिया यांना अटक होऊ शकते. खुद्द सिसोदिया यांनीही तसे म्हटले आहे. आपच्या वतीने काल सकाळी सिसोदिया यांची चौकशी सुरू झाल्यापासून किमान १० पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत.

Manish Sisodia
CBI नंतर आता सिसोदियांवर ED चा छापा पडणार ? ; PMLA अंतर्गत लावली 2 कलमे

दिल्लीतील शिक्षण धोरणाची स्तुती करणारा मजकूर थेट न्यू यॉर्क टाईम्सने प्रसिध्द केलयाचा मुद्दा केजरीवाल यांनी काल प्रमाणपत्र मिळाल्याप्रमाणे मांडला होता. भाजपने पुढच्या तासाभरात, हाच मजकूर दुबईतील खलिज टाईम्समध्ये जसाच्या तसा छापून आल्याचा प्रतिहल्ला केला. केजरीवाल यांनी खलिज टाईम्सचा अंक दाखविला नव्हता. खलिज टाईम्सच्या लेखात, 'न्यू यॉर्क टाईम्सच्या सौजन्याने' असे म्हटल्याचा खुलासा आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला.

मात्र, एकाच लेखकाचा एकच लेख-बातमी दोन देशांतील दोन भिन्न प्रकृतीची वृत्तपत्रे जसाच्या तसा छापतात तेव्हा ती जाहिरात किंवा पेड न्यूज ठरत नाही का, या भाजप व पत्रकारितेतील जाणकारांच्या प्रश्नावर आपने प्रत्युत्तर दिले नाही. या मजकुराचे लेखक कंवलजीतसिंग हे विदेशी वृत्तपत्रांसाठी दिल्लीतून बातमीदारी करतात. त्यांनी यापूर्वी कोरोना काळात व त्याआधी-नंतरही भारताच्या विरोधात सातत्याने ट्विट केल्याचेही भाजपने निदर्शनास आणले आहे.

सिसोदिया म्हणाले की केजरीवाल हे अत्यंत कडवे प्रामाणिक नेते आहेत. त्यांनी दिल्लीतील शिक्षण व आरोग्य व्यवस्थेचा कायापालट केला. त्यामुळेच भाजप नेतृत्वाने आधी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना (सत्येंद्र जैन) अटक केली व काही दिवसांत ते मलाही अटक करतील. गरीब व मध्यम वर्गासाठीच काम करणारे केजरीवाल चांगले काम करणाऱ्यांची प्रशंसा करतात व त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. मोदी मात्र आपल्या उद्योगपती मित्रांसाठी, त्यांच्या करमाफीसाठी देशाची तिजोरी वापरतात. चांगले काम करणाऱ्यांना धमकावतात, त्यांना नेस्तनाबूत करण्याचे डाव खेळतात, त्यासाठी ईडी व सीबीआयचा वापर करून घेतात. मात्र, कितीही रोखले तरी केजरीवाल यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाणार असून २०२४ ची लोकसभा निवडणूक मोदी विरूध्द केजरीवाल अशी होणार हे नक्की आहे.

ज्या अबकारी धोरणावरून केंद्र सरकारने माझ्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला ते धोरण देशातील सर्वांत चांगले अबकारी धोरण आहे. असा दावा करून सिसोदिया म्हणाले की आम्ही दिल्लीत हे धोरण प्रामाणिकपणे लागू केले तेच मोदी सरकारला नको होते. दिल्लीत जेथे दारूची दुकाने उघडलीच जाऊ शकत नाही तेथेही आपने ती उघडली, हा भाजपचे विधानसभेतील नेते रामवीरसिंह बिधुडी यांचा आरोप सिसोदीया यांनी फेटाळला. मुद्दा दिल्लीतील दारू धोरण हा नाहीच कारण भाजप नेते हा कथित घोटाळा ८ हजार कोटी व ११०० कोटींचा सांगतात.

उपराज्यपालांचा आकडा १४४ कोटींचा आहे. पण खुद्द सीबीआयच्या एफआयआरमध्ये हे तिन्ही आकडे नाहीत. त्यात मोघम म्हटले आहे की दारू धोरणात १ कोटीचा घोटाळा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणजेच मुळात घोटाळा हा मुद्दाच नाही. गुजरातेत दरवर्षी १० हजार कोटींचे उत्पादन शुल्क बुडविले जाते. पंतप्रधानांनी बुंदेलखंडमध्ये उद्घाटन केलेला एक्प्रेस वे काही दिवसांतच पूर्ण खचला. गुजरातचे दारू माफिया किंवा रस्ता ठेकेदारांकडे सीबीआय गेली नाही व जाणारही नाही कारण हे भाजपचे गैरप्रकार आहेत. अरविंद केजरीवाल व त्यांची देशभरातील वाढती लोकप्रियता ही भाजपची खरी धास्ती व भिती आहे, असा आरोप त्यांनी केला.

Manish Sisodia
CBI Raid : सिसोदिया यांची पंधरा तास चौकशी ; लॅपटॅाप, मोबाईल जप्त

दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, खासदार मनोज तिवारी आदी भाजप नेत्यांनी सिसोदिया यांच्या आरोपांवर पलटवार केला. केजरीवाल यांची पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली आहे. मात्र, विरोधी पक्षच त्यांना स्वीकारण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजप व पंतप्रधानांनवर निशाणा साधण्यास सुरवात केली. ही वैफल्यग्रस्त मानसिकता आहे असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com