दिल्लीत राष्ट्रवादीची ताकद वाढली; योगानंद शास्त्रींचा पक्षप्रवेश

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शास्त्री यांचे पक्षात स्वागत केले.
Yoganand Shastri Joins NCP
Yoganand Shastri Joins NCP

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ताकद आणखी वाढली आहे. दिल्ली काँग्रेसचे माजी प्रभारी पी. सी. चाको यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) यांनीही बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाला बळ मिळाले आहे. शास्त्री यांनी मागील वर्षीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शास्त्री यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी चाको यांच्यासह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. 77 वर्षीय योगानंद शास्त्री यांनी दिल्लीत अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना ते विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी आतापर्यंत दिल्लीत सहा वेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून तीनवेळी जिंकली आहे.

Yoganand Shastri Joins NCP
भाजपला धक्का : विश्वजित राणेंचा 'आप'मध्ये प्रवेश

शास्त्री यांनी पहिल्यांदा 1993 मध्ये मालविय नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. पण त्यानंतर 19998, 2003 आणि 2008 अशा सलग तीनवेळा त्यांनी विजय मिळवला. 2008 मध्ये त्यांनी मेहरौली मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2013 मध्ये भाजपचे परवेश साहिब सिंग यांनी त्यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे 2015 मध्येही त्यांनी याच मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलं. यावेळी त्यांना अपयश आले.

शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना शास्त्री यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये दोनवेळा स्थान मिळाले होते. त्यांच्याकडे आरोग्य, सामाजिक न्याय व विकास, अन्नधान्य वितरण अशी महत्वाची खाती होती. अनेक वर्ष काँग्रेसची साथ दिल्यानंतर प्रदेशाध्यक्षांशी खटके उडाल्यानंतर त्यांनी मागील वर्षी पक्षाला रामराम ठोकला. ते आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण काँग्रेसचे माजी दिल्ली प्रभारी चाको यांनी शास्त्री यांचे मन वळवून राष्ट्रवादी प्रवेश करून घेतला.

गोव्यात भाजपला धक्का

पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी गोवा भाजपला मोठा धक्का भाजपला आहे. भाजपचे नेते विश्वजित कृष्णराव राणे यांनी पक्षाला रामराम करत आम आदमी पक्षात प्रवेश केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकडून गोव्यात जोर लावण्यास सुरूवात करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राणे यांच्यासोबत भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला आहे.

मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात दाखल होत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांच्या उपस्थितीत सट्टारी येथे झालेल्या कार्यक्रमात राणे यांनी आपमध्ये प्रेश केला. राणे हे गोव्यातील स्थानिक नेते असून 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पोरियम विधानसभा मतदारसंघातून तिकीटही दिले होते. पण काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com