उत्तर प्रदेशात आणखी एक माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार... - Dalit man forced to drink urine in Lalitpur district of Uttar Pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर प्रदेशात आणखी एक माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार...

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस अत्याचार प्रकरणावरुन राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. राज्यात आता आणखी एक माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. 

लखनौ : हाथरस येथील दलित मुलीवरील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. आता दलित व्यक्तीला हीन वागणूक देण्यात आल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दलित व्यक्तीला मारहाण करुन त्याला मूत्रप्राशन करायला लावल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. 

उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. आता ललितपूर जिल्ह्यात 65 वर्षीय दलित व्यक्तीला मूत्रप्राशन करायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या व्यक्तीला आणि त्याचा मुलाला बेदम मारहाणही करण्यात आली होती. रोडा गावात मागील आठवड्यात ही घटना घडली होती. या घटनेतील पीडिताचे नाव अमर असे आहे. त्याने म्हटले आहे की, सोनू यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मला मूत्रप्राशन करण्याची जबरदस्ती केली. मी याला नकार दिल्याने त्यांनी मला काठ्यांनी मारहाण केली. याचबरोबर माझ्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. आम्ही त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 

या घटनेला पोलीस अधीक्षक मिर्जा मंझर बेग यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रोडा गावातील काही वजनदार व्यक्तींनीच गावातील दोघांना मारहाण केली. यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर आम्ही एफआयआर दाखल केला आहे. अशा प्रकारचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. 

हाथरसमधील 19 वर्षांच्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. नंतर उपचारादरम्यान 29 सप्टेंबरला दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

हाथरस प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाने कारवाईची कुऱ्हाड चालवली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख