सावधान! तौते चक्रीवादळाची तीव्रता वाढतेय; महाराष्ट्रासह पाच राज्ये अलर्ट

महाराष्ट्रासह पाच राज्यांवर तौते या चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. पुढील काही तासांत हे वादळ आणखी तीव्र स्वरुप धारण करण्याचा अंदाज आहे.
Cyclone Tauktae May Intensify Within Hours says India Meteorological Department
Cyclone Tauktae May Intensify Within Hours says India Meteorological Department

मुंबई : महाराष्ट्रासह पाच राज्यांवर तौते (Tauktae) या चक्रीवादळाचे (Cyclone) संकट घोंघावू लागले आहे. पुढील काही तासांत हे वादळ आणखी तीव्र स्वरुप धारण करण्याचा अंदाज आहे. कोकणात रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झाली असून, केरळलाही वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. या वर्षात देशावर धडकणारे हे पहिलेच चक्रीवादळ आहे. पाच राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (NDRF) 50 पथके तैनात करण्यात आली आहेत. 

देशावर कोरोनाचे संकट असताना आता दुसरीकडे हे अस्मानी संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा आणि गुजरात या राज्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये या वादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे रस्त्यांवर उन्मळून पडल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगौड या जिल्ह्यांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अलप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, थ्रिसूर, पलक्कड या जिल्ह्यांत काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या तौक्ते या वादळाचे रुपांतर चक्रीवादळामध्ये झाले आहे.  पुढील काही तासांत त्याची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज आहे.  हे वादळ 18 मे रोजी गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. पोरबंदर ते नलिया दरम्यान ते धडकेल. या वादळाची तीव्रता १६ ते १८ मे या कालावधीत आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. 

अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर येण्याच्या आणि दरडी कोसळण्याच्या घटना केरळ, कर्नाटक आणि गोव्यात रविवारपर्यंत घडण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या भागात मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा तडाखा बसेल आणि पूर येण्याच्या तसेच, दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तमिळनाडू आणि राजस्थानमध्येही या वादळामुळे पाऊस पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. 

मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाची विमाने, हेलिकॉप्टर, डायव्हिंग आणि आपत्ती निवारण पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही पथके या वादळाच्या काळात पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना मदत करतील, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com