कोव्हिशिल्ड लशीच्या मंजुरीबाबत युरोपियन युनियनचा मोठा खुलासा - covishield approval request not received says european union | Politics Marathi News - Sarkarnama

कोव्हिशिल्ड लशीच्या मंजुरीबाबत युरोपियन युनियनचा मोठा खुलासा

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जून 2021

युरोपियन युनियनच्या नवीन व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत कोव्हिशिल्ड लशीचा समावेश  नसल्याने खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरण (Covid Vaccination) पुन्हा एकदा वेगाने सुरू झाले आहे. परंतु, आता कोव्हिशिल्ड (Covishield) लशीबाबत नवीन समस्या निर्माण झाली आहे. ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनचे (European Union) सध्या तरी बंद राहणार आहेत. आता कोव्हिशिल्ड लशीच्या मंजुरीसाठी अर्जच करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

यावर आज युरोपियन युनियनने खुलासा केला असून, म्हटले आहे की, कोव्हिशिल्डच्या मंजुरीसाठी युरोपियन युनियनकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आल्यास त्यावर योग्य प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यात येईल. ही मंजुरी देण्याचे काम युरोपियन मेडिसीन एजन्सी करते. अद्याप एजन्सीकडे कोव्हिशिल्डचा मंजुरीसाठी प्रस्ताव आलेला नाही. 

युरोपियन युनियनच्या नवीन व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नाही. 1 जुलैपासून युरोपियन युनियन डिजिटल कोव्हिड सर्टिफिकेट योजना सुरू करीत आहेत. याअंतर्गत कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना युरोपियन युनियनमध्ये मुक्तपणे कुठेही प्रवास करता येईल. संबंधित व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे, तो निगेटिव्ह चाचणी केलेला अथवा कोरोनातून बरा झालेला याचा पुरावा हे प्रमाणपत्र पुरावा असेल. युरोपियन युनियनच्या बाहेरील व्यक्तींना हे प्रमाणपत्र सदस्य देशांममध्ये प्रवास करण्यासाठी आवश्यक असेल. 

या योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नसल्याने ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करता येणार नाही. त्यांना प्रवास करण्यासाठी अनेक बंधने असतील. त्यांना विलगीकरणात राहावे लागेल अथवा प्रत्येक देशांतील नियमांप्रमाणे उपाययोजना कराव्या लागतील.    

हेही वाचा : सहा जणांच्या मंत्रिमंडळात भाजपचे दोन मंत्री पण त्यांचाही खातेवाटपाचा तिढा 

यावर कोव्हिशिल्डचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांनी खुलासा केला होता.  त्यांनी म्हटले होते की, युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. युरोपियन युनियनच्या नव्या व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आणि सिरमने उत्पादित केलेली कोव्हिशिल्ड लस नाही. मी हा मुद्दा उच्च स्तरीय पातळीवर उपस्थित केला आहे. नियामक आणि राजनैतिक पातळीवर सर्व  देशांशोबत यावर लवकरच तोडगा निघेल. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख