स्वातंत्र्यदिन ठरणार ऐतिहासिक; कोरोनायोद्धे लाल किल्ल्यावर विशेष निमंत्रित

स्वातंत्र्यदिनाचा सोहळा यंदा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. या कार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून, आज त्यांनी तयारीचा आढावा घेतला.
covid19 warriors invited to independence day celebration at lal fort in delhi
covid19 warriors invited to independence day celebration at lal fort in delhi

नवी दिल्ली : उद्याच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी देशाला संबोधित करणार आहेत. देशातील या मुख्य सोहळ्याच्या तयारीचा सुरक्षा यंत्रणांनी आज आढावा घेतला. यंदाच्या सोहळ्यासाठी कोरोना योद्ध्यांसह चार हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले असून, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत.  

कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाच्या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग व मास्कसह सर्व उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे उपस्थितांना बंधनकारक असेल. उद्याच्या मुख्य कार्यक्रमात आमंत्रितांना रांगा लावण्याचा त्रास होऊ नये यासाठी लाल किल्ल्याच्या चौतर्फा अतिरिक्त फाटके बसविण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी येणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. मास्क व हँड सॅनिटायजरही परिसरात ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. 

ल्यूटियन्स दिल्लीत आज निमलष्करी जवान व पोलिसांनी ताबा घेतला आहे. संसद मार्ग व त्याच्या आजूबाजूच्या (रायसीना, रेड क्रॉस, अकबर, हमायू, बाबर, शहाजहाँ, रफी, अशोक, राजाजी, डलहौसी आदी) रस्त्यांना छावणीचे स्वरूप आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दुपारनंतरच सुटी दिली असून, रात्री 8 नंतर या भागात शुकशुकाट पहायला मिळाला. लाल किल्ला परिसराचे आज वारंवार सॅनिटायजेशन करण्यात आले. 

पंतप्रधान म्हणून सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणारे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान, असा विक्रम करणारे नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या आगमनाआधी दीड तास लाल किल्ला परिसरात संपूर्ण प्रवेशबंदी असेल. यंदा कोरोना योध्दे, राजदूत, केंद्रीय मंत्री, राजकीय नेते, अधिकारी, विद्यार्थी व पत्रकार मिळून चार हजार लोकांनाच प्रवेशपत्रे जारी करण्यात आली आहेत. दरवर्षी ही संख्या 15 हजारांच्या आसपास असते. 

दिल्लीत अनलॉक-3 चे दिशानिर्देश लागू असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह अन्य आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. दोन खुर्च्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर ठेवण्यात येईल. यंदाच्या सोहळ्यात प्रथमच दिल्ली पोलिसांचा बँड वाजणार नाही. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्या पोलिसांना 15 दिवसांपासून अत्यंत कडेकोट विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची नियमित आरोग्य तपासणीही केली जात आहे. लाल किल्ला परिसरातही रूग्णवाहिका व डॉक्‍टरांची नेहमीपेक्षा जास्त पथके तैनात असतील. 

यंदा शालेय विद्यार्थ्यांऐवजी राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (एनसीसी) निवडक मुलांनाच प्रवेश दिला जाईल व त्यांचीही बसण्याची व्यवस्था जनपथ रस्त्यावरच्या लाल किल्ल्याजवळील भागात करण्यात आली आहे. 

राष्ट्रपती भवनात उद्या सायंकाळी होणाऱ्या स्नेहमिलन कार्यक्रमात राष्ट्रपती व पंतप्रधानांसह देशाचे संपूर्ण मंत्रिमंडळ यात सहभागी होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने नेहमीच्या तुलनेत फक्त 10 टक्के आमंत्रितांनाच यासाठी बोलावण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नेहमी किमान 100 देशांच्या राजदूतांना मिमंत्रण असते. मात्र यंदा फक्त 10 टक्के म्हणजे 10 राजदूतांनाच बोलावले जाईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com