गुड न्यूज : कोरोनाबाधित महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म - covid positive woman gives birth to a healthy baby in uttar pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

गुड न्यूज : कोरोनाबाधित महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म

वृत्तसंस्था
शनिवार, 15 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरू असली तरी नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या संकटामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. या बिकट परिस्थितीत काही आशेचे किरणही समोर येत आहेत. एका कोरोनाबाधित महिलेने निरोगी बाळाला जन्म दिल्याची बाब समोर आली आहे. 

ही घटना उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे घडली आहे. तिल्हार भागातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सरलादेवी (वय30) हिला त्रास होऊ लागल्याने मेडिकल कॉलेजमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर तिची नैसर्गिक प्रसूती झाली आणि तिने  एका बाळाला जन्म दिला. या बाळाला मात्र, कोरोनाचा संसर्ग झाला नाही. याच रुग्णालयातील आयसीयूमध्ये आणखी दोन कोरोनाबाधित महिलांनी बाळांना जन्म दिला. यातील एका महिलेचे बाळ दगावले, अशी माहिती मेडिकल कॉलेजच्या जनसंपर्क अधिकारी डॉ.पूजा त्रिपाठी यांनी दिली.  

देशात 24 तासांत 3 लाख 26 हजार रुग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 26 हजार 98 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे.देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 207 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 लाख 53 हजार 299 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याच कालावधीत नवीन रुग्णांची संख्या 3 लाख 26 हजार 98 आहे. मागील पाच दिवसांत चार दिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची संख्या अधिक आहे. देशातील महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये 70.49 टक्के बरे होणारे आहेत. 

हेही वाचा : कोरोनाचा भारतीय प्रकार अधिक धोकादायक; लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाख 73 हजार 802 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 15.07 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 83.83 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख