सावधान : पुढील चार ते सहा आठवड्यात देशातील कोरोना मृत्यू दुप्पट होणार; तज्ञांचा अंदाज - covid 19 deaths in india will double in next 4 to 6 weeks | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

सावधान : पुढील चार ते सहा आठवड्यात देशातील कोरोना मृत्यू दुप्पट होणार; तज्ञांचा अंदाज

वृत्तसंस्था
बुधवार, 5 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुढील 4 ते 6 आठवडे भारतासाठी धोक्याचे आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona)  रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून, ही संख्या 11 जूनपर्यंत 4 लाखांवर जाईल, असा अंदाज बंगळूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने वर्तविला आहे. याचवेळी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील इन्स्टिट्यूच ऑफ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनने जुलैअखेर 10 लाख जणांचा मृत्यू कोरोनामुळे होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. (covid 19 deaths in india will double in next 4 to 6 weeks )

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने गणितीय पद्धतीच्या अंदाज वर्तविला आहे. यानुसार,  देशातील कोरोनाचा कहर आता सुरू आहेत तसाच कायम राहिल्यास 11 जूनपर्यंत देशातील कोरोना मृत्यू 4 लाख 4 हजारांवर जातील. कोरोना विषाणूचा उद्रेक कशा पद्धतीने होईल, असे सांगणे अनिश्चित आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात तर ते अशक्यप्राय आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता बळींच्या संख्येत भारत नक्कीच अमेरिकेला मागे टाकणार आहे. आतापर्यंत जगात सर्वाधिक 5 लाख 78 हजार जणांचा कोरोनामुळे अमेरिकेत मृत्यू झाला आहे.  

हेही वाचा : कोरोनाबाधित पित्याच्या चितेत मुलीने मारली उडी 

ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे अधिष्ठाता आशिष झा म्हणाले की, पुढील चार ते सहा आठवड्यांचा काळ अतिशय कठीण असणार आहे. आता भारत जी पावले उचलेल त्याचा परिणाम पुढील काळातील गोष्टींवर पडेल. परंतु, सध्याची भारतातील परिस्थिती पाहता यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. 

देशात 24 तासांत 3 हजार 780 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 6 लाख 65 हजार 148 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार 188 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 82 हजार 315 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 87 हजार 229 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.87 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82.03 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख