अभाविपच्या वादग्रस्त राष्ट्रीय अध्यक्षांची मदुराई 'एम्स'वर वर्णी - Controversial ABVP leader appointed as a member of AIIMS in Madurai | Politics Marathi News - Sarkarnama

अभाविपच्या वादग्रस्त राष्ट्रीय अध्यक्षांची मदुराई 'एम्स'वर वर्णी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबय्या शण्मुगम यांची प्रस्तावित मदुराई एम्सवर वर्णी लावण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीवरुन मोठा गदारोळ उडाला आहे. 

चेन्नई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबय्या शण्मुगम यांची मदुराईतील प्रस्तावित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) सदस्यपदी निवड करण्यात  आली आहे. त्यांच्या नियुक्तीवरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. 

डॉ. शण्मुगम हे किलपोक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रोयापेट्टा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेचे सहसचिव सुनील शर्मा यांनी डॉ. शण्मुगम यांच्या मदुराई 'एम्स'वरील नियुक्तीचा आदेश 15 ऑक्टोबरला काढला आहे. 

डॉ. शण्मुगम काही दिवसांपूर्वी त्यांच्या पराक्रमामुळे अडचणीत आले होते. त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या दारावर त्यांनी किरकोळ भांडणातून मूत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते आणि शण्मुगम यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अखेर तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने या प्रकरणावर पडदा पडला होता. 

शण्मुगम यांच्याविरोधात आडम्बक्कम पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २७१ ( जाणीवपूर्वक नियमांचा भंग करणे ) आणि ४२७ ( नुकसान करण्याच्या हेतूने कृती करणे ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचबरोबर तमिळनाडू महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल झाला होता. 

या प्रकरणी सुरवातीला ज्येष्ठ महिलेच्या कुटुंबीयांनी आडम्बक्कम पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करणे टाळले होते. पोलिसांना तक्रारदारांना केवळ तक्रार मिळाल्याची पोच दिली होती. नंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणी पोलीस टीकेचे धनी झाले होते. पोलिसांनी शण्मुगम यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण संकुलातील पार्किंगच्या जागेवरुन शण्मुगम आणि संबंधित तक्रारदार महिला यांच्यात वाद होता. मागील चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. शण्मुगम हे संबंधित महिलेचे पार्किंग वापरत होते परंतु, त्या महिलेला पार्किंग वापराचे पैसे देण्यास नकार देत होते. यावरुन त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते. यामुळे संतापलेल्या शण्मुगम यांनी महिलेच्या दारावर मूत्रविसर्जन करण्याचा पराक्रम केला. 

या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ फुटेज व्हायरल झाले आहे. शण्मुगम यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शण्मुगम हे संबंधित महिलेच्या दारावर मूत्रविसर्जन करताना दिसत आहेत. याचबरोबर ते वापरलेला मास्कही तेथे फेकून देताना दिसत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख