आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भडका उडूनही देशात पेट्रोल, डिझेल 'जैसे थे'!

देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी दरवाढीचा भडका उडाला आहे. मात्र, मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर स्थिर आहेत.
for consecutive nine days petrol and diesel prices stable in country
for consecutive nine days petrol and diesel prices stable in country

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेl. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव भडकले असूनही सलग नऊ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामागे देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर आहेत. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक महागडे आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 27 फेब्रुवारी रोजी वाढ झाली होती. त्यानंतर सलग नऊ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 68.47 डॉलरवर गेला आहे. याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी घसरुन 73.02 या पातळीवर आला आहे. यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीला ब्रेक लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

प्रमुख महानगरांतील आजचे पेट्रोल, डिझेलचे दर (स्रोत : इंडियन ऑईल) 
दिल्ली : पेट्रोल - 91.17, डिझेल - 81.47 
मुंबई : पेट्रोल - 97.57, डिझेल - 88.60 
चेन्नई : पेट्रोल - 93.11, डिझेल - 86.45 
कोलकता : पेट्रोल 91.35, डिझेल - 84.35 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. 

पेट्रोलच्या दरात 27 फेब्रुवारीला प्रतिलिटर 15 पैसै वाढ झाली होती. त्यावेळी दिल्लीत पेट्रोल 91.17 रुपयांवर गेले. हा दिल्लीतील आतापर्यंतचा पेट्रोलचा सर्वाधिक दर आहे. याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.57 रुपयांवर पोचला आहे. डिझेलचा दर दिल्लीत प्रतिलिटर 81.47 रुपये आणि मुंबईत 88.60 रुपयांवर गेला आहे. सलग नऊ दिवस कोणतेही बदल न झाल्याने  हे दर कायम आहेत. 

गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. पेट्रोलवर केंद्र व राज्याचा 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले आहेत. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९ रुपये एवढा कर आकारत आहे. महाराष्ट्र सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होताना दिसत नाहीत. 

आयात केलेल्या खनिज तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल-डिझेलचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतुकीचा तसेच, पणन खर्च आणि नफा असे मिळून सुमारे ३.७५ रुपये प्रतिलिटर होतात. त्यानंतर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क लागू होते. त्यामध्ये प्रतिलिटर मूलभूत उत्पादन शुल्क १.४ रुपये, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ११ रुपये आणि कृषी संरचना व विकास उपकर २.५ रुपये आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क १८ रुपये असे मिळून ३२.९ रुपयांचे विविध कर केंद्र सरकारकडून आकारले जातात. महाराष्ट्र सरकार त्यावर २५ टक्के व्हॅट म्हणजेच १६.६६ रुपये आणि १०.१२ रुपये अतिरिक्त कर लावतो. त्यानंतर पेट्रोलचे दर ठरले जातात. याचप्रमाणे डिझेलचे दरसुद्धा ठरवण्यात येतात. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com