काँग्रेसच्या 'हाय कमांड'ची तब्बल 24 वर्षांनी होतेय निवडणूक - congress working committee election will be held in june month | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या 'हाय कमांड'ची तब्बल 24 वर्षांनी होतेय निवडणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत अध्यक्ष निवडीसाठी जूनमध्ये निवडणूक घेण्याचे ठरले आहे. याचबरोबर कार्यकारिणीची निवडणूकही होत आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी जून महिन्यात निवडणूक होणार आहे. याचवेळी काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूकही होत आहे. या निवडणुकीचं विशेष म्हणजे ती तब्बल 24 वर्षांनी होणार आहे. पक्षाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या खंडानंतर कार्यकारिणीची निवडणूक होत आहे. काँग्रेसचे 'हाय कमांड' अशी ओळख असलेल्या कार्यकारिणीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आज ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदासह कार्यकारिणीची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे.

कार्यकारिणीची निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी होणार की नंतर होणार असा मुद्दा आजच्या बैठकीत उपस्थित झाला होता. सर्वसाधारणपणे  काँग्रेसची घटना पाहिल्यास काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आधी होते आणि त्यानंतर कार्यकारिणीची निवडणूक होती, असा मुद्दा एका नेत्याने आज उपस्थित केला. मात्र, आजच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. 

मागील वर्षी निवडणूक आयोगाने अंतर्गत निवडणुका घेण्याबाबत काँग्रेसला सूचना केली होती. यामुळे मागील वर्षीच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटनात्मक निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक समितीला अंतिम स्वरुप दिले होते. या समितीने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रतिनिधींची यादीही अंतिम केली असून, ती वेणूगोपाल यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.  

मागील वर्षी लोकसभा निवडणूकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष  न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

काही महिन्यांपूर्वी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला होता. पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नाही. काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला. तर एका गटाने राहुल गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्याबाबत मत व्यक्त केले होते. 

Edited By Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख