प्रदेशाध्यक्ष अन् विरोधी पक्षनेत्यांचा वादात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच नाही! - congress will not announce name of cm candidate for karnataka-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

प्रदेशाध्यक्ष अन् विरोधी पक्षनेत्यांचा वादात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच नाही!

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

कर्नाटकात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यात वाद सुरू झाला आहे. 

बंगळूर :  कर्नाटकात (Karnataka) विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील (Congress) मतभेद समोर येऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यात वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोघांनाही थेट राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भेटीला दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे हाय कमांडने हे नाव जाहीर करण्यासच नकार दिला आहे. 

भाजपमध्ये मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विरोधात अनेक नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. भाजपध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरू असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही याची सुरवात झाली आहे. राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न काँग्रेसमध्ये उपस्थित झाला आहे. यावरून कॉंग्रेस आमदारांमध्ये वाद सुरू झाला असून, दोन गट पडले आहेत. 

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील वादाची पक्षाच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. या दोघांनाही दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते. दोघांशी राहुल गांधींनी चर्चा केली. राज्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याची भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. याचबरोबर दोन्ही नेत्यांना एकत्रितपणे काम करण्याची तंबीही देण्यात आली आहे. 

यानंतर कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही राज्यात एकत्रितपणे काम करतील, अशी घोषणा सुरजेवाला यांनी केली. पंजाबमध्ये काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. यामुळे कर्नाटकच्या बाबतीत निर्णय घेताना पक्षाने सावध पावले उचलली आहेत. 

कर्नाटकात दोन वर्षांनी म्हणजेच 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दीडशेहून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. निवडणूक निकालानंतर आमदारच मुख्यमंत्र्यांची निवड करतील, असे पक्षाचे म्हणणे आहे. याचबरोबर राज्यात पक्षात संघटनात्मक बदल पुढील काही आठवड्यांत होणार आहेत, अशी  माहिती सूत्रांनी दिली.  

हेही वाचा : येडियुरप्पांना काँग्रेस आमदारांचा पाठिंबा अन् भाजपने दिला इशारा 

सिध्दरामय्या  आणि शिवकुमार यांचे समर्थक आमदार आपापल्या नेत्यांसाठी आतापासूनच बॅटिंग करू लागले आहेत. सिद्धरामय्या हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत, असे काही आमदारांनी जाहीर वक्तव्य केल्याने प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार अस्वस्थ झाले होते. याबाबत शिवकुमार यांनी दिल्लीत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सुरजेवाला यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पक्षाचे आमदार आणि नेत्यांना ताकीद दिली होती.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख