काँग्रेस देणार निवडणूक आयोगाला आव्हान..! - congress will challenge election commission order about kamal nath | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस देणार निवडणूक आयोगाला आव्हान..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे प्रचारासह नेत्यांच्या चिखलफेकीलाही जोर आला आहे.  

भोपाळ : माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला आहे.  निवडणूक आयोगाने याची दखल घेत कमलनाथ यांनी नोटीस बजावली होती. आता निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारक हा दर्जा काढून घेतला आहे. या निर्णयाला काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. 

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील सभेत बोलताना कमनाथ यांनी आयटम असे संबोधन वापरले होते. कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिला उमेदवाराबद्दल असे विधान केल्याबद्दल कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावर भाजपही आक्रमक झाला असून, कमलनाथ यांच्याविरोधात भाजपने मोहीम उघडली आहे. 

या प्रकरणात निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला होता. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले होते. कमलनाथ यांनी महिला उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे महिला आयोगाने म्हटले होते. या प्रकरणी भाजपनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. 

कमलनाथ यांना या प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. या नोटिशीला दिलेल्या उत्तरात कमलनाथ यांनी इमरती देवींचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी दोषी ठरवले होते. निवडणूक आयोगाने त्यांना तंबीही दिली होती. आचारसंहितेच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करु नये, अशी ताकीद आयोगाने कमलनाथ यांना दिली होती. 

आता निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यांनी आचारसंहिता भंग केला असून, त्यांना दिलेल्या इशाऱ्याचे उल्लंघन केले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. याविषयी बोलताना मध्य प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा म्हणाले की, पक्षाचे नेते कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला पक्ष आव्हान देणार आहे. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. 

आता कमलनाथ हे स्टार प्रचारक नसल्याने त्यांना स्वत:च्या पैशाने प्रवास आणि निवासासह इतर व्यवस्था करावी लागेल. याचबरोबर निवडणुकीशी निगडित खर्चही त्यांनाच करावा लागेल. स्टार प्रचारकाचा खर्च हा पक्ष करीत असतो आणि तो अमर्यादित असू शकतो. आता कमलनाथ यांचा हा दर्जाच काढून घेण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख