रियासाठी काँग्रेस आक्रमक; ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून काढले मोर्चे - Congress takes out rallies against victimisation of Rhea Chakraborty | Politics Marathi News - Sarkarnama

रियासाठी काँग्रेस आक्रमक; ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून काढले मोर्चे

वृत्तसंस्था
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या समर्थनार्थ बॉलीवूडमधील अनेक जण पुढे येत असताना आता काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. यामुळे या प्रकरणी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

कोलकता : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. रियाचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली. आता रियाच्या पाठिंब्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आली आहे. काँग्रेसने आज ठिकठिकाणी मोर्चे काढून रियाला न्याय देण्याची जोरदार मागणी केली आहे. यामुळे या प्रकरणी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीने काही कलाकारांना या प्रकरणी नोटीस बजावली असून, यात राकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि सिमॉन खंबाटा या तीन अभिनेत्रींना चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांनी रिया चक्रवर्ती हिला निष्कारण अटक करण्यात आल्याचा दावा केला होता. सुशांतसिंह राजपूत याला भाजपने बिहारमधील निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी अभिनेत्यावरुन बिहारी अभिनेता केले, असा टोलाही चौधरी यांनी लगावला होता. 

काँग्रेसने आज कोलकत्यात रियाच्या समर्थनासाठी रॅली काढली. सुमारे तीनशेहून अधिक कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. रियाला खलनायक बनवणे थांबवा, तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. बंगालमधील एका मुलीचा छळ केला जात असून, सुडाच्या राजकारणाची ती शिकार होत आहे, अशी भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या रॅली पश्चिम मिदनापूर आणि पश्चिम बर्धवान जिल्ह्यातही काढण्यात आल्या. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख