शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई! राज्यसभेला डावलताच नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

संघ परिवारवाल्यांना हे कधीच कळणार नाही..
Pawan Khera
Pawan Khera Sarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) दहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात काही ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देऊन नवीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळं अनेक नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांनी तर थेट ट्विट करीत पक्षाला सवाल विचारला आहे. (Rajya Sabha Election News Updates)

पवन खेरा हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत अतिशय आक्रमकपणे काँग्रेसची बाजू मांडत असतात. त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे त्यांनी हिंदीमधून ट्विट करीत थेट पक्ष नेतृत्वाला प्रश्न विचारला आहे. ‘शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई’, असं ट्विट त्यांनी केलं आहे. यामुळं राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याचवेळी खेरा यांनी पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

काही वेळानंतर खेरा यांच्या ट्विटवरून गदारोळ सुरू झाला. त्यामुळं नंतर त्यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली. ते म्हणाले की, काँग्रेसनंच मला ओळख दिली आहे. मी पक्षाचा प्रवक्ता असेन अथवा काँग्रेस सरकारमधील कायदा मंत्री असेन, आमची ओळख काँग्रेस पक्षामुळेच आहे. हे आपण कुणीही विसरू नये. या माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. देशासाठी जगणाऱ्या आणि प्राणही देणाऱ्या परिवारासोबत मी उभा आहे. संघ परिवारवाल्यांना हे कधीच कळणार नाही.

Pawan Khera
सिद्धूची सुरक्षा कुणी काढली? मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

उमेदवारांची यादी जाहीर करताना काँग्रेसने असंतुष्ट नेत्यांच्या 'जी २३' गटाला डावललं आहे. या यादीत तुलनेने तरुण आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्ती चेहऱ्यांना स्थान दिलं आहे. उदयपूरला झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार निर्णय घेत जुन्या नेत्यांना घरी बसवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात याही वेळी काँग्रेसने बाहेरचा उमेदवार देण्याची परंपरा कायम राखली. उत्तर प्रदेशातील मुस्लिम नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवार मिळाली आहे.

Pawan Khera
असंही राजकारण! राज्यात काँग्रेसचे आमदार दोन पण राज्यसभेचे उमेदवार तीन

'जी२३' गटाचे प्रमुख नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांनी सलग चार ते पाच वेळा राज्यसभेवर प्रतिनिधित्व केल्याने नव्या नेत्यांना संधी देण्याचा निकष आता लावला आहे. 'जी २३' गटातील पण नंतर गांधी कुटुंबाकडे वळालेले मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून तर याच गटातील दुसरे नेते विवेक तनखा यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेची मुदत संपलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तमिळनाडूतून उमेदवारी मिळाली आहे. राजीव शुक्ला यांना छत्तीसगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सरचिटणीस जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला यांना अनुक्रमे कर्नाटक आणि राजस्थानमधून उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख ब्राह्मण नेते प्रमोद तिवारी यांना राजस्थानमधून संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांना हरियानातून उमेदवारी मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com