काँग्रेसचा 'दे धक्का' तर भाजपची पिछेहाट..! - congress registers big win rajasthan urban bodies election | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचा 'दे धक्का' तर भाजपची पिछेहाट..!

वृत्तसंस्था
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला मागे टाकले आहे. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला मागे टाकले आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. राज्यातील 90 पैकी 48 नगरपालिकांत काँग्रेसने झेंडा फडकला आहे तर भाजपला 37 नगरपालिकांमध्ये यश मिळवता आले आहे. 

हेही वाचा : सचिन पायलट यांना बालेकिल्ल्यातच मोठा झटका

राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. राज्यात 90 नगरपालिकांसाठी निवडणूक झाली. यातील तीन ठिकाणी बिनविरोध निवड झाली तर 87 ठिकाणी निवडणूक झाली. यात काँग्रेसने 48 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. भाजपने 37 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. तीन ठिकाणी बिनविरोध निवड झाली असून, यात राष्ट्रीय लोकतांत्रिक दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक ठिकाणी सत्ता मिळाली आहे. 

काँग्रेसच्या या विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोस्तारा यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील 90 नगरपालिकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. एकूण 90 पैकी 50 ठिकाणी काँग्रेसने विजय मिळाला आहे. यात दोन ठिकाणी अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता मिळाली आहे. भाजपने मागील वेळी 60 ठिकाणी विजय मिळवला होता. आता भाजपला केवळ 37 ठिकाणी विजय मिळाला आहे. या मोठ्या विजयाबद्दल सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पूनिया यांनी पक्षाच्या पिछेहाटीची कसर आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने 50 हून अधिक ठिकाणी विजय मिळाल्याचा दावा केला असला तरी त्यांना कमी ठिकाणी विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाच्या सर्व शंका जनता आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत दूर करेल. नवनियुक्त सर्व नगर पालिका अध्यक्षांना शुभेच्छा! 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख