काँग्रेसच्या आमदारासह 50 जणांना अटक - Congress MLA among 50 arrested for anti Macron stir in bhopal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

काँग्रेसच्या आमदारासह 50 जणांना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

फ्रान्समधील हल्ल्यानंतर जगभरात गदारोळ उडाला होता. त्यावेळी फ्रान्सच्या अध्यक्षांचा निषेध भोपाळमध्ये करण्यात आला होता. 

भोपाळ : फ्रान्समधील नीस शहरात झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जण ठार झाले असून, काही जण जखमी होते. या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निषेध करणे काँग्रेसच्या आमदाराला चांगलच महागात पडले आहे. आमदार आरिफ मसूद यांच्यासह 50 जणांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 

नीसमधीन नोत्रे-दाम बॅसिलिका येथे काल 30 ऑक्टोबरला एक व्यक्तीने चाकूहल्ला केला होता. यात दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला तर इतर काही जण जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी हल्लोखोराला अटक केली असून, चौकशी सुरू केली आहे. याआधी फ्रान्समधील नैऋत्येकडील शहर अॅव्हिग्नॉन आणि सौदी अरेबियातील फ्रान्सचा दूतावास याठिकाणीही चाकूहल्ले झाले आहेत. 

काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेषिताचे व्यंगचित्र दाखवले होते. यामुळे संतापलेल्या एका 18 वर्षांच्या युवकाने सॅम्युएल पॅटी या शिक्षकाचा पॅरीसच्या उपनगरी भागात शिरच्छेद केला होता. दोन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेपासून फ्रान्समध्ये चाकूहल्ले सुरू झाले आहेत. पॅटी यांच्या मृत्यूनंतर फ्रान्स सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला होता. 

फ्रान्समधील हल्ल्यांनतर जगभरात गदारोळ उडाला आहे. या प्रकरणी काँग्रेसचे मध्य प्रदेशातील आमदार आरिफ मसूद यांनी काही मौलवींसह भोपाळमधील इकबाल मैदानावर मागील आठवड्यात निषेध केला होता. त्या वेळी सुमारे दोन हजारहून अधिक जण उपस्थित होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कोरोनाविषयीच्या नियमांचा भंग करुन गर्दी जमवल्याप्रकरणी तलैया पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. 

या प्रकरणी आरिफ मसूद यांच्यासह 50 जणांना मध्य प्रदेश पोलिसांनी काल अटक केली होती. या सर्वांच्या विरोधातील गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या सर्वांनी पोलीस ठाण्यात जामीन सादर केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती मध्य प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक उपेंद्र जैन यांनी दिली.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख